नवी दिल्ली – जागतिक बाजारात सोने आणि चांदीच्या भावात चढ-उतार होत आहेत. कारण डॉलरचा भाव कमी-जास्त होत आहे. त्यामुळे भारतीय बाजारातही सोने-चांदीच्या दरात लाटा निर्माण होत आहेत.
बुधवारी सोन्याचा भाव 23 रुपयांनी वाढून 47,024 रुपये प्रति 10 ग्रॅम झाला. तयार चांदीचा भाव 399 रुपयांनी कमी होऊन 67,663 रुपये प्रति किलो या पातळीवर गेला.
जागतिक बाजारात सोन्याचा भाव वाढून 1,812 डॉलर तर चांदीचा भाव 26.02 डॉलर प्रति औंस या पातळीवर होता.
याबाबत एचडीएफसी सिक्युरिटीज या संस्थेचे विश्लेषक तपन पटेल यांनी सांगितले की, करोनाचे रुग्ण व महागाई वाढण्याची शक्यता यामुळे गुंतवणूकदार निर्णय घेत नाहीत.
त्यामुळे डॉलर आणि धातूंचे दर सध्या अस्थिर आहेत.
जोपर्यंत परिस्थिती निवळत नाही तोपर्यंत या क्षेत्रात स्थिरता येण्याची शक्यता कमी आहे. जर महागाई खरोखरच वाढली तर सोने आणि चांदीच्या दरात वाढ होऊ शकते. त्याचबरोबर औद्योगिक उत्पादन वाढण्याची शक्यता असल्यामुळे चांदीला आगामी काळामध्ये मागणी वाढण्याची शक्यता असल्याचे त्यांनी सांगितले.