नवी दिल्ली- इंधनाच्या दरात बेसुमार वाढ झाल्यामुळे त्याचा वाहन विक्रीवर परिणाम होत आहे. त्याचबरोबर एकूणच महागाई वाढण्याची भीती निर्माण झाली असल्याचे वाहन उत्पादकाच्या संघटनेने म्हटले आहे.
सोसायटी ऑफ इंडियन ऑटोमोबाईल मॅन्युफॅक्चरर्स या संघटनेने आज जून महिन्यातील वाहन विक्रीची आकडेवारी जाहीर केल्यानंतर ही भावना व्यक्त केली. गेल्या अनेक महिन्यापासून एकतर्फी पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ होत आहे. ही दरवाढ कधीतरी थांबेल अशी अपेक्षा आम्ही करीत आहोत. कारण त्याचा वाहन ग्राहकांच्या मानसिकतेवर नकारात्मक परिणाम होत आहे.
वाहन विक्रीवर नेमका किती परिणाम होणार आहे असे विचारले असता या संघटनेच्या प्रवक्त्याने सांगितले की, यासंदर्भात मूल्यांकन अवघड आहे. मात्र सर्वसाधारणपणे महाग इंधन असल्यानंतर ग्राहक वाहन खरेदी करण्याचे टाळतात. व्यवसाईक वाहनाबरोबरच इतर वाहनांच्या विक्रीवर घट होण्याची शक्यता व्यक्त करून प्रवक्ता म्हणाला की, वाहतुकीचा खर्च वाढल्यामुळे सर्वच जीवनावश्यक वस्तूंच्या दरात आगामी काळात वाढ होण्याची शक्यता आहे.
वाहन उद्योगासमोर आणखी कोणते प्रश्न निर्माण होणार आहेत असे विचारले असता प्रवक्ता म्हणाला की कच्च्या मालाचे दर वाढत असल्यामुळे वाहन कंपन्यांना आपल्या उत्पादनाच्या दरात वाढ करावी लागत आहे. जागतिक पातळीवर सेमीकंडक्टरच्या किमती वाढल्या आहेत. एवढेच नाही तर वाढीव किमतीवर सेमीकंडक्टर उपलब्ध होण्यात अडचणी निर्माण होत आहेत. त्याशिवाय करोना आगामी काळात कसे रूप धारण करतो याकडे आमचे लक्ष आहे.
अशा प्रकारच्या अडचणी असताना भविष्याबाबत निश्चित वक्तव्य करणे अवघड आहे. मात्र तरीही आम्ही या परिस्थितीत काम करीत आहोत. पहिल्या लाटेबरोबरच दुसऱ्या लाटेचा वाहन उद्योगावर बराच परिणाम झाला असल्याचे त्यांनी सांगितले. जी वाहने खराब आहेत अशा वाहनांना मोडीत काढण्याचे धोरण अंमलात आणले जावे. तारखेनुसार वाहन मोडीत काढण्याचा निर्णय घेतल्यानंतर चांगली वाहने बाद होऊ शकतात असे प्रवक्ता म्हणाला.
जून महिन्यात वाहन विक्री वाढली
दरम्यान गेल्या वर्षाच्या जून महिन्याच्या तुलनेत या वर्षी जून महिन्यामध्ये वाहन विक्री वाढली आहे. गेल्या वर्षी 11,30,744 वाहनांची विक्री झाली होती. यावर्षी यामध्ये वाढ होऊन 12,96,807 वाहनांची विक्री झाली आहे. कंपन्यांनी वितरकाकड पाठविलेल्या वाहनांची ही संख्या आहे. मोटरसायकलच्या विक्रीवर फारसा परिणाम झालेला नाही. मात्र व्यावसायिक व तीन चाकी वाहनांच्या विक्रीवर परिणाम होत असल्याचे या संघटनेने म्हटले आहे.