पुणे – करोनाच्या पार्श्वभूमीवर पंढरपूर येथे आषाढी वारीसाठी यंदा शासनाने एसटी बसमधून संतांच्या पादुका घेऊन जाण्यास परवानगी दिली आहे. त्यानुसार श्री संत ज्ञानेश्वर महाराज, श्री संत तुकाराम महाराज, श्री संत सोपानदेव महाराज आणि श्री संत चांगावटेश्वर महाराज या संतांच्या पालख्या दि. 19 जुलैला पुण्याहून पंढरपूरला जाणार आहे.
करोनाच्या पार्श्वभूमीवर या पालख्या जाणाऱ्या मार्गावरील गावांमध्ये पाचपेक्षा जास्त व्यक्तींना एकत्र येण्यास मनाई करण्यात आली आहे. त्यासाठीचे आदेश जिल्हाधिकारी यांनी काढले आहेत.
करोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाकडून विविध मार्गदर्शक सूचना दिलेल्या आहेत. संतांच्या पादुका घेऊन जाणाऱ्या एसटी बस कोणत्याही ठिकाणी दर्शनासाठी थांबविण्यात येऊ नये, असे आदेश विभागीय आयुक्तांनी दिले आहेत.
त्यानुसार ग्रामीण भागाच्या हद्दीत पालखी मार्गावर संतांच्या पादुकांचे दर्शनासाठी नागरिकांची एका ठिकाणी होणारी गर्दी टाळण्यासाठी व कायदा सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी जिल्हाधिकारी यांनी जमावबंदीचे आदेश दिले आहेत.