नवी दिल्ली -जागतिक बाजारात सोन्याच्या दरात मोठी घट झाली. त्याचबरोबर रुपयाच्या मूल्यात वाढ झाली. या कारणांमुळे भारतीय बाजारांमध्ये सोन्याच्या दरात शुक्रवारी मोठी घट नोंदली गेली.
दिल्ली सराफात सोन्याचा दर 451 रुपयांनी कमी होऊन 46,844 रुपये प्रति 10 ग्रॅम झाला. त्याचबरोबर तयार चांदीचा दर 559 रुपयांनी कमी होऊन 67,465 रुपये प्रति किलो या पातळीवर गेला.
याबाबत मोतीलाल ओसवाल फायनान्शिअल सर्व्हिसेसचे उपाध्यक्ष नवनीत दमाणी यांनी सांगितले की या आठवड्यात सोन्याच्य घरामध्ये सुरुवातीला वाढ झाली होती. मात्र गेल्या दोन दिवसांत सोन्याच्या दरात घट होत आहे. आगामी काळात सोन्याचा दर अस्थिर राहण्याची शक्यता विश्लेषकांना वाटते.