-दोन रुग्ण करोनामुक्त : पिंपरीतील डॉ. डी. वाय. पाटील रुग्णालयाचा दावा
-दोन कृत्रिम रेणूंचे मिश्रण करतात नैसर्गिक मानवी प्रतिपिंडांची (अँटीबॉडी) नक्कल
पिंपरी -करोनाची दुसरी लाट हळूहळू ओसरत असतानाच, पिंपरी येथील डॉ. डी. वाय. पाटील रुग्णालय व संशोधन केंद्राने एक दिलासादायक दावा केला आहे. या रुग्णालयाने दावा केला आहे की, करोनाबाधित रुग्णांवर अँटीबॉडी कॉकटेल उपचार पद्धती प्रभावी ठरत आहे.
या रुग्णालयाने दोन करोनाबाधित रुग्णांना अँटीबॉडी कॉकटेल उपचार देऊन पूर्णपणे बरे केले आहे. मोनोक्लोनल अँटीबॉडीजच्या वापरामुळे हा प्रयोग यशस्वी झाला आहे, असा दावा रुग्णालय प्रशासनाने केला आहे.
या औषधांमध्ये दोन कृत्रिम रेणूंचे मिश्रण आहे, जे करोना विषाणूंविरूद्ध नैसर्गिक मानवी प्रतिपिंडांची (अँटीबॉडीजची) नक्कल करतात. हे औषध मोनोक्लोनल अँटीबॉडीज नावाच्या अत्याधुनिक औषधांच्या समूहांपैकी एक असून ते विविध प्रकारच्या आजारांविरुद्ध प्रभावी आहेत. या उपचार पद्धतीसाठी दोन रुग्ण निवडण्यात आले होते. यातील एक रुग्ण हा अतिजोखीम गटातील होता तर दुसऱ्या रुग्णामध्ये ताप, थकवा आणि इतर सौम्य लक्षणे दिसून आली होती.
या दोन्ही रुग्णांच्या रक्तवाहिनीमध्ये कासिरिव्हीमॅब आणि इंडेव्हिमॅब ही दोन इंजेक्शन्स सोडण्यात आली. ही औषधे शरीरात गेल्यावर विषाणूंना अवरोध करतात .चोवीस तासांच्या आत या रुग्णांमध्ये सकारात्मक परिणाम दिसून आले. या उपचार पद्धतीद्वारे दोन्ही रुग्णांच्या शरीरातून करोनाची लक्षणे गायब झाली. याशिवाय या उपचारपद्धतीमुळे त्यांना इतर कोणता त्रास किंवा दुष्परिणामही झाले नाहीत. त्यांना 14 दिवस देखरेखीखाली ठेवण्यात आले.
अतिजोखीम गटातील रुग्ण सात दिवसांत बरे
अँटिबॉडी कॉकटेल उपचार पद्धतीद्वारे अतिजोखीम गटातील रुग्ण सात दिवसांच्या आत बरे होतात अशी माहिती रुग्णालयाच्या श्वसन विकार विभागाचे प्रमुख डॉ. निवृत्त ब्रिगेडिअर एम. एस. बरथवाल यांनी दिली. तर करोनाबाधित रुग्णांसाठी अँटिबॉडी कॉकटेल उपचार पद्धती ही प्रभावी असल्याचे सिद्ध झाले आहे.