वॉशिंग्टन – जगातील विविध देशांच्या व्हिसा मिळण्याच्या स्थितीच्या आधारावर शक्तिशाली पासपोर्टची एक यादी दरवर्षी जाहीर केली जाते. त्यानुसार यंदा प्रकाशित झालेल्या यादीत भारताचे स्थान घसरले आहे.
भारताचे स्थान सहा अकांनी घसरले असून भारत या यादीत आता 90 व्या स्थानावर आहे. या यादीत जपान सर्वोच्च स्थानावर आहे तर चीन आणि संयुक्त अरब अमिराती या देशांचे यादीतील स्थान सुधारले आहे. या यादीत अफगाणिस्तानची स्थिती सर्वात खराब असून हा देश सर्वात तळात म्हणजे 116 व्या स्थानावर आहे.
हेनेल पासपोर्ट इंडेक्स या नावाने ही यादी तयार केली जाते. जपानचा पासपोर्ट असलेल्या व्यक्तीला जगातील 196 देशांमध्ये व्हिसाची अनुमती घ्यावी लागत नाहीं किंवा त्या नागरीकाला व्हिसा ऑन अरायव्हलची सुविधा मिळते.
या यादीत सिंगापुर दुसऱ्या स्थानावर असून सिंगापूरचा पासपोर्ट असलेल्या व्यक्तीला 192 देशांमध्ये व्हिसाची सवलत आहे. तुमच्या पासपोर्टच्या आधारे किती देशांमध्ये तुम्हाला त्वरेनी व्हिसा जारी करून तुम्हाला प्रवेश दिला जातो त्या आधारे त्या देशाचा पासपोर्ट किती शक्तिशाली आहे हे ठरवले जाते.
त्यानुसार भारताच्या पासपोर्टवर 58 देशांमध्येच व्हिसा सवलत मिळत आहे. त्या आधारे भारताचे स्थान 90 व्या क्रमाकांवर आहे. मागच्या वर्षी भारताचे स्थान 84 क्रमाकांवर होते.त्यात आता सहा अंकांनी घसरण झाली आहे.