नाशिक – इगतपुरी येथे सुरू असलेल्या एका रेव्ह पार्टीचा नाशिक पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. मुंबई-आग्रा महामार्गावरील मानस रिसॉर्टमधील स्काय ताज व्हिलातील दोन बंगल्यात रेव्ह पार्टीचा धांगडधिंगा सुरू होता. या घटनेची माहिती मिळताच ग्रामीण पोलीस ठाण्याचे अधीक्षक सचिन पाटील यांनी पोलीस पथकासह छापा टाकत धडक कारवाई केली आहे.
या रेव्ह पार्टीत 10 पुरुष आणि 12 महिलांचा समावेश होता. यातील काही पुरुष आणि महिला मादक पदार्थांचं सेवन करत बिभत्स अवस्थेत आढळून आल्या आहेत. यातील चार तरुणी या चित्रपट सृष्टीशी संबंधित असल्याची माहितीही समोर आली आहे.
यातील काही महिला बॉलीवूड, तर काही दक्षिणात्य चित्रपटसृष्टीशी संलग्न आहेत. याशिवाय एक अभिनेत्री “बिग बॉस’ या रिऍलिटी शोमधील माजी स्पर्धक आहे. यामध्ये एका इराणी महिलेचादेखील समावेश आहे.
याप्रकरणी पोलिसांनी छापा टाकल्यानंतर ट्रायपॉड, कॅमेरा आणि मादक पदार्थ जप्त केले आहेत. या सर्व आरोपींना ताब्यात घेतले असून, करोना नियमाच्या उल्लंघनासोबत, अवैधरित्या पार्टीचे आयोजन करणे, अशा विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वेश्याव्यवसायाच्या अंगानेदेखील या घटनेचा तपास केला जात आहे.