पुणे – जिल्ह्यात करोना प्रतिबंधक लसीकरण मोहिमेत सलग दुसऱ्या दिवशी एक लाखापुढे लसीकरण करण्यात आले. शनिवारी सायंकाळी सात वाजेपर्यंत विक्रमी 1 लाख 11 हजार 713 जणांचे लसीकरण झाले. 663 लसीकरण केंद्रावर ही लसीकरण मोहीम पार पडली. त्यामध्ये 437 शासकीय, 226 खासगी केंद्राचा समावेश आहे.
पुणे जिल्ह्यात शुक्रवारी (दि. 25) सर्वाधिक 1 लाख 37 हजार 72 जणांचे लसीकरण झाले होते. लसींचा पुरेशा पुरवठा झाला, तर पुणे जिल्ह्यात दररोज एक ते दीड लाख लसीकरण करण्याचे नियोजन आहे.
दरम्यान, आतापर्यंत पुणे जिल्ह्यात 43 लाख 17 हजार 681 जणांचे लसीकरण झाले असून, त्यामध्ये 18 वर्षांपुढील सर्वांचा समावेश आहे. त्यामध्ये 35 लाख 16 हजार 382 जणांनी पहिला डोस घेतला आहे, असे आरोग्य विभागाने सांगितले.