स्टॉकहोम, (स्वीडन) – स्वीडनचे पंतप्रधान स्टेफन लोफ्वेन यांच्याविरोधातील अविश्वास ठराव संसदेमध्ये मंजूर झाला आहे. त्यामुळे लोफ्वेन यांना राजीनामा देणे अपरिहार्य झाले आहे. लोफ्वेन हे सोशल डेमोक्रॅटिक पक्षाचे नेते होते.
देशातील रिअल इस्टेट क्षेत्रातील किंमती गगनाला भिडल्यामुळे त्यांच्याविरोधात प्रचंड जनमत तयार झाले होते. लोफ्वेन हे 2014 सालापासून स्वीडनच्या पंतप्रधानपदावर होते.
स्वीडनमधील छोट्या लेफ्ट पार्टी या पक्षाने लोफ्वेन यांच्याविरोधात अविश्वास ठराव मांडला होता. अल्पमतातील सरकारला याच पक्षांनी पाठिंबा दिला होता. दोन पक्षांच्या आघाडी सरकारमध्ये हा पक्ष सहभागी झालेला नव्हता.
मात्र सरकारची विधायके मंजूर करण्यासाठी या पक्षाने सरकारला पाठिंबा दिला होता. करोनाच्या साथीच्या काळात रिअल इस्टेटच्या किंमतींमध्ये प्रचंड वाढ झाली. त्यामुळे लेफ्ट पार्टीने सरकारचा पाठिंबा काढण्याचा निर्णय घेतला.
स्वीडनमध्ये घरांच्या किंमती मर्यादित राखण्यासाठी घर भाड्याने देण्यावर कठोर निर्बंध आहेत. नवीन घरे बांधणारे विकसक अडचणीत आले आहेत. घरांच्या किंमती वाढल्याने घरे विकत घेणे सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर गेले आहे आणि हे लोक घर भाड्यानेही घेऊ शकत नाहीत.