बीजिंग – पक्ष्यांमध्ये आढळणाऱ्या बर्ड फ्लू या साथीच्या रोगासाठी कारणीभूत असणाऱ्या एच10एन3 या विषाणूच्या मानवी संसर्गाची पहिली घटना चीनच्या जिआंगसू प्रांतात उघड झाली आहे, असे चीनच्या राष्ट्रीय आरोग्य आयोगाने मंगळवारी जाहीर केले.
झेनजिआंग शहरात राहणाऱ्या 41 वर्षीय व्यक्तीला ही बाधा झाली असून त्याची प्रकृती सध्या स्थिर आहे. त्याला रुग्णालयातून सोडण्याइतपत तो बरा झाला असल्याचेही त्यांनी सांगितले.
मानवात बर्ड फ्लूची साथ पसरण्याचा धोका अद्याप नाही. विषाणूंचे हे संक्रमण पोल्ट्रीतून झाले होते. त्यामुळे त्यातून साथ पसरण्याचा धोका अत्यल्प असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. या रुग्णाला एच10एन3 म्हणजे एव्हिअन एन्फुएन्झा विषाणूची (बर्ड फ्ल्यू) लागण झाल्याचे 28 मे रोजी निदान झाले होते, असे आयोगाच्या निवेदनात म्हटले आहे. मात्र, त्यात या व्यक्तीला ही लागण कशी झाली याबाबत कोणताही उल्लेख करण्यात आला नाही. या विषाणूची मानवाला बाधा झाल्याचे जगात अन्यत्र एकही उदाहरण अद्याप आढळलेले नाही, असे स्पष्ट केले आहे.
एच10एन3 हा तुलनेने कमी क्षमतेचा विषाणू आहे. तो मुख्यत: पोल्ट्रीत आढळतो. तो पसरण्याची भीती खूप कमी आहे. या विषाणूचे वेगवेगळे अवतार चीनमध्ये आढळतात. त्यापैकी काहींचा पोल्ट्रीत काम करणाऱ्यांना संसर्ग होतो.