पुणे -करोनाची साथ रोखण्यासाठी लसीकरणाचे महत्त्व पटवून देणारी आणखी एक बाब शहरात समोर आली आहे. कारोनाच्या दुसऱ्या लाटेने शहरात धुमाकूळ घातलेला असताना पालिकेच्या 65 टक्केहून अधिक कर्मचाऱ्यांचे लसीकरण झाल्याने दुसऱ्या लाटेत 126 पालिका कर्मचारी बाधित झाले तर एका कर्मचाऱ्याचा करोनामुळे मृत्यू झाला.
दुसऱ्या लाटेत डॉक्टर आणि परिचारीकांना मोठ्या प्रमाणात लागण झाली असली तरी त्यांची लक्षणे सौम्य आहेत. महापालिका कर्मचाऱ्यांचे लसीकरण वेळेत झाल्याने प्रशासनाला दुसऱ्या लाटेत मोठा दिलासा मिळाला आहे.
शहरात मागील वर्षी दि. 9 मार्चला करोनाचा पहिला रुग्ण आढळून आला, त्यानंतर शहरात ऑक्टोबरच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत करोनाच्या साथीने थैमान घातले तर त्यानंतर डिसेंबर 2020 तसेच जानेवारी आणि फेब्रुवारीच्या 2021च्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत शहरात साथ ओसरली होती.
मात्र, त्यानंतर फेब्रुवारीच्या दुसऱ्या आठवड्यापासून शहरात करोनाच्या दुसऱ्या लाटेने थैमान घातले आहे. 9 फेब्रुवारी ते 5 मे अखेर शहरात तब्बल 2 लाख 42 हजार 793 नवीन बाधित रुग्ण आढळले. त्यात महापालिकेच्या 126 कर्मचाऱ्यांचा समावेश असून एका कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला आहे.
9 मार्च 2020 ते 9 फेब्रुवारी 2021 या पहिल्या लाटेच्या कालावधीत 1 लाख 93 हजार एकूण बाधितांमध्ये महापालिकेचे 668 कर्मचारी करोना बाधित झाले होते तसेच त्यातील 51 जणांचा करोनाने मृत्यू झाला होता. त्यामुळे मागील लाटेच्या तुलनेत दुसरी लाट जीवघेणी असली तरी पालिकेच्या कर्मचाऱ्यांना वेळीच लसीकरणाचे कवच मिळाल्याने महापालिकेस मोठा दिलासा मिळाला आहे.
लसीकरणाची सक्ती केली म्हणून…
केंद्रशासनाकडून देशात 16 जानेवारी पासून फ्रंटलाइन वर्करचे लसीकरण सुरू करण्यात आले. त्यात, शासकीय तसेच वैद्यकीय कर्मचाऱ्यांचा समावेश होता. सुरूवातीच्या टप्प्यात हे लसीकरण शासनाने ऐच्छिक ठेवले होते तसेच लसींबाबत अनेक अफवा असल्याने पालिकेच्या कर्मचाऱ्यांकडूनही लस घेण्यास टाळाटाळ करण्यात आली.
त्यानंतर महापालिकेने लसीकरण सक्तीचे केले. जे कर्मचारी लसीकरण करणार नाहीत तसेच त्यांना दुसऱ्या लाटेत करोना झाला तर त्यांना महापालिकेकडून देण्यात येणारे फायदे मिळणार नाहीत, असे प्रशासकीय आदेशच काढण्यात आले. त्यामुळे, पालिका कर्मचाऱ्यांनी मोठ्या प्रमाणात लसीकरण करून घेतले. त्याचा फायदा आता दिसून आला.
पहिल्या लाटेचे चित्र
शहरात दि. 9 मार्च 2020 ते 9 फेब्रुवारी 2021 या कालावधीत एकूण बाधित 1 लाख 93 हजार त्यामध्ये पालिकेचे बाधित कर्मचारी 668 आणि एकूण 50 कर्मचाऱ्यांचा मृत्यू.
दुसऱ्या लाटेचे चित्र
शहरात दि. 9 फेब्रुवारी ते 5 मे पर्यंत या कालावधीत एकूण बाधित 2 लाख 42 हजार पालिकेतील बाधित कर्मचारी 126 आणि मृत्यू एक कर्मचारी.