अहमदाबाद – देशातील अनेक राज्यांप्रमाणे गुजरातमधील करोना संकटही तीव्र बनले आहे. त्यापार्श्वभूमीवर, गुजरातमधील सत्तारूढ भाजपच्याच दोन आमदारांनी राज्यात लॉकडाऊन लागू करण्याची मागणी केली आहे.
केतन इनामदार आणि शैलेश मेहता या भाजपच्या आमदारांनी सोमवारी वडोदरामधील स्थितीच्या आढाव्यासाठी बैठक घेतली. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी करोना संसर्गाची साखळी तोडण्यासाठी गुजरातमध्ये लॉकडाऊन लावण्याची गरज अधोरेखित केली. मागील वर्षीच्या तुलनेत यावर्षी मोठे विवाह सोहळे होत आहेत. त्याशिवाय, करोनाविषयक नियमांच्या पालनाविषयी ग्रामीण भागात जनजागृतीचे प्रमाण अत्यल्प दिसते. त्या बाबींमुळे स्थिती आणखीच गंभीर बनू शकते. त्यामुळे लॉकडाऊन लावण्याची मागणी करणारे पत्र मी याआधीच मुख्यमंत्री विजय रूपानी यांना पाठवले आहे, असे इनामदार म्हणाले. त्यांच्या भूमिकेशी मेहता यांनी सहमती दर्शवली. मागील काही दिवसांपासून गुजरातमधील करोनाबाधितांची संख्या वेगाने वाढत आहे. त्या राज्यात एका दिवसात उच्चांकी 14 हजार 340 नवे करोनाबाधित आढळले. त्यामुळे गुजरातमधील बाधित संख्येने 5 लाखांचा टप्पा ओलांडला आहे.