नवी दिल्ली, दि. 26 – कोणत्याही पेशंटकडे जर करोना चाचणीचे पॉझिटिव्हचे प्रमाणपत्र नसले तरी त्याला जर करोनाविषयक लक्षणे दिसत असतील तर त्याला चाचणीचा आग्रह न धरता रुग्णालयात दाखल करून त्याच्यावर उपचार सुरू करावेत, ही केजरीवाल सरकारने रुग्णालयांना केलेली सूचना दिल्ली हायकोर्टाने रास्त ठरवली आहे.
या सूचनेचा काटेकोर अंमल करा, असेही हायकोर्टाने दिल्लीतील रुग्णालयांना सुनावले आहे. या संबंधात केजरीवाल सरकारने 23 एप्रिल रोजी एक परिपत्रक रुग्णालयांना जारी केले होते. त्या परिपत्रकाला मोठ्या प्रमाणावर प्रसिद्धी देण्याची सूचनाही हायकोर्टाने दिल्ली सरकारला केली आहे.
करोना टेस्ट पॉझिटिव्ह असेल तरच रुग्णालयांमध्ये पेशंटना दाखल करून घेतले जात आहे त्याच्या विरोधात हायकोर्टात एक जनहित याचिका दाखल करण्यात आली होती. त्यावरील सुनावणीच्यावेळी हायकोर्टाने हा आदेश दिला आहे. आम्ही हा आदेश 23 एप्रिल रोजीच काढला आहे, अशी माहिती दिल्ली सरकारच्या वतीने हायकोर्टात दिली.