मुंबई – देशाचे गृहमंत्री अमित शहा व राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यामध्ये गुजरातेतील अहमदाबाद शहरामध्ये गुप्त बैठक झाल्याची बातमी कालपासून चर्चेचा विषय ठरली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसकडून अशी कोणतीही बैठक झाल्याचे वृत्त नाकारण्यात आले असले तरी अमित शहा यांनी मात्र याबाबत वक्तव्य करत बैठकीचे गूढ कायम ठेवले. काही राजकीय जाणकारांनी तर या कथित भेटीनंतर महाराष्ट्रातील सत्ताधारी महाविकास आघाडीच्या भवितव्याबाबतच चिंता व्यक्त केली. ही सर्व चर्चा सुरु असतानाच आता शिवसेना खासदार संजय राऊत यांनी याबाबत ट्विट केलं आहे.
आपल्या ट्विटमध्ये राऊत यांनी, शरद पवार व अमित शहा यांच्यामध्ये बैठक झाल्याच्या चर्चा सपशेल फेटाळल्या. ते म्हणतात, “काही गोष्टी वेळीच स्पष्ट करायला हव्यात अन्यथा त्यामुळे गोंधळाची परिस्थिती निर्माण होते. मी ठामपणे सांगतो अशी काही गुप्त भेट वगैरे अजीबात झालेली नाही . आता तरी रहस्य कथेचा शेवट करा.अफवांची धुळवड थांबवा. हाती काहीच लागणार नाही.”
कुछ बातें समय के साथ स्पष्ट हो जानी चाहिए, वरना भ्रम पैदा हो जाता है। मैं विश्वास के साथ कह सकता हूं कि शरद पवार जी और अमित शाह के बीच अमदाबाद या कहीं भी कोई गुप्त बैठक नहीं हुई है। अब तो अफवाहों का अंत करो। इससे कुछ हाथ नहीं लगेगा। pic.twitter.com/HpWnp1BBHd
— Sanjay Raut (@rautsanjay61) March 29, 2021
दरम्यान, शरद पवार व अमित शहा यांच्या या कथित भेटीनंतर भाजप नेत्यांनी केवळ ‘सूचक’ प्रतिक्रिया देत याबाबतचे गूढ कायम ठेवले आहे. मात्र भेटीबाबतची नेमकी माहिती अद्यापही समोर आली नसल्याने राजकीय वर्तुळामध्ये व समाज माध्यमांवर, ‘ही भेट खरंच झाली का? या भेटीदरम्यान नेमकी काय चर्चा झाली? या भेटीचा परिणाम महाविकास आघाडी सरकारच्या भवितव्यावर होईल काय?’ असे अनेक प्रश्न चर्चिले जात आहेत.
अशातच आज, शरद पवार यांना आज प्रकृती अस्वास्थ्यामुळे मुंबईतील एका खासगी रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले आहे. त्यांच्यावर लवकरच शस्त्रक्रिया करण्यात येणार असून यामुळे त्यांचे यापुढचे सर्व कार्यक्रम तात्पुरते स्थगित करण्यात आले आहेत. शरद पवार हे १ एप्रिलपासून निवडणूक प्रचारासाठी पश्चिम बंगाल येथे जाणार होते मात्र त्यांचा नियोजित दौरा देखील रद्द करण्यात आलाय.