– नीलकंठ मोहिते
रेडा(प्रतिनिधी) : इंदापूर तालुक्यातील 128 कोटी रकमेच्या विविध विकास कामांचे उद्घाटन भूमिपूजन खासदार सुप्रिया सुळे यांच्या हस्ते व सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या अध्यक्षतेखाली निमगाव केतकी येथे ऑनलाईन पद्धतीने पार पडले. यावेळी अचानक राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी ऑनलाईन हजेरी लावल्याने सर्वांना सुखद धक्का मिळाला. पहिल्यांदाच उद्घाटन सोहळ्यास शरद पवार यांची उपस्थिती लाभल्याने तालुक्यातील नागरिकांनी टाळ्या वाजवत उत्साहाने स्वागत केले.
पक्षाध्यक्ष शरद पवार हे राष्ट्रीय नेते असल्यामुळे, त्यांच्या कामाच्या व्यापामुळे इंदापूर तालुक्यात कार्यक्रमाला उपस्थित राहू शकत नव्हते. आजपर्यंतच्या इतिहासात ज्या-ज्या वेळेस शरद पवार यांच्या उपस्थितीत इंदापूर तालुक्यामध्ये कोणताही कार्यक्रम असो, तालुका लोटून उपस्थित राहतो. व पवार येथील जनतेला कधीही मोकळ्या हाताने पाठवत नाहीत हा इतिहास आहे. ऑनलाइनवर राज्यमंत्री दत्तात्रय भरणे नागरिकांना म्हणाले, करोना महामारीचे संकट असल्यामुळे ऑनलाइन विकास कामाची आपण उद्घाटने करत आहोत, असे असले तरीदेखील नवीन अद्यावत ऑनलाईन पद्धत चांगली आहे. आपल्या पवार साहेब देखील आगामी काळात अशा ऑनलाईन कार्यक्रमात सहभागी होऊन आपणास मार्गदर्शन करतील.
राज्यमंत्री भरणे यांनी हे विधान करताच चक्क शरद पवार ऑनलाइन कॅमेरासमोर खासदार सुप्रिया सुळे यांच्यासह सहभागी झाले. व तालुक्यातील उपस्थित नागरिकांना नमस्कार करत शुभेच्छा दिल्या. त्यामुळे राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांची इच्छापूर्ती तात्काळ पूर्ण झाली आहे. शरद पवार यांचे ऑनलाइन इंदापूर तालुक्यातील नागरिकांना दर्शन होताच राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्यासह नागरिकांनी टाळ्या वाजवत शरद पवार यांचे स्वागत केले.
दत्तात्रय भरणे यांनी इंदापूर तालुक्यात विकासकामांचा धडाका लावला आहे. याच विकासकामांचा प्रारंभ सुप्रिया सुळे यांच्या हस्ते होत असताना शरद पवार यांची उपस्थिती लाभल्यामुळे इंदापूर तालुक्यातील शेतकऱ्यांचे प्रश्न नागरिकांचे प्रश्न आगामी काळात तात्काळ सुटले जातील, अशी अपेक्षा नागरिकांना लागली आहे.