- प्रवेशद्वारावर सदस्यांचा संताप
- सभा ऑनलाइन असल्याबाबत नगरसेवकच अनभिज्ञ
पिंपरी – पिंपरी चिंचवड शहरामध्ये करोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. त्यामुळे महापालिकेची सभा ऑनलाइन घेण्याचा निर्णय सत्ताधारी व प्रशासनाने घेतला. मात्र त्याची माहिती नगरसेवकांनाच नसल्याने आज ऑनलाइन सभेवरून चांगलचा गोंधळ रंगला. सत्ताधारी पक्षाच्या नगरसेवकांनाच सभागृहाच्या प्रवेशद्वारावर अडविण्यात आले. त्यामुळे सदस्य आणि सुरक्षारक्षकांमध्ये बाचाबाची झाली. महापौर माई ढोरे यांनी सभेसाठी ठराविक नगरसेवकांनी सभागृहात, इतरांनी ऑनलाईन उपस्थित राहण्याचे आदेश काढले होते. परंतु, त्याची माहिती न मिळाल्यामुळे सभेला आलेल्या नगरसेवकांनी संताप व्यक्त केला.
महापालिकेची नियोजित महासभा गुरुवारी दुपारी दीड वाजता होती. तत्पूर्वी करोनाचा वाढता प्रादुर्भाव विचारात घेता ही सभा ऑनलाइन घेण्याचे आदेश काढण्यात आले होते. त्यानुसार प्रमुख पदाधिकाऱ्यांनी सभागृहात उपस्थित राहावे आणि इतर नगरसेवकांनी ऑनलाइन उपस्थित राहण्याचे आदेश काढले. मात्र, हे आदेश न मिळाल्याने सर्वपक्षीय नगरसेवकांनी सभेला हजेरी लावली. सभागृहात जाताना सुरक्षारक्षकांनी महापौरांचा आदेश दाखवून नगरसेवकांना मज्जाव केला. त्यामुळे नगरसेवक आणि सुरक्षारक्षकांमध्ये वाद झाला. नंतर प्रवेश देण्यात आला.
यावरून विरोधी नगरसेवकांसह सत्ताधारी नगरसेवकांनीही संताप व्यक्त केला. आदेश काढूनही त्यांची कोणती माहिती मिळाली नाही. लोकशाही पद्धतीने नगरसेवकांचा असलेला हक्क हिरावला जात आहे. आम्हाला नागरिकांनी निवडून त्यांचे प्रश्न मांडण्यासाठी पाठविले आहे. जर आम्हाला प्रवेशच मिळणार नसेल तर आम्ही जनतेला काय उत्तर देणार. इतर ठिकाणी नियम पाळले जात नाही. इथे नगरसेवकांना अडविण्यासाठी नियमांचा आधार घेतला गेला. सर्व नियम पाळून नगरसेवकांना उपस्थित राहण्याची परवानगी द्यावी. अशी मागणी नगरसेवक अजित गव्हाणे, राजू मिसाळ, मंगला कदम, सीमा सावळे, आशा शेंडगे, विकास डोळस, राहुल कलाटे, सचिन भोसले यांनी केली.