मुंबई – अमेरिका आणि युरोपातील अनेक देशासह भारतातील करोना रुग्णांची संख्या वाढत असल्यामुळे शेअर बाजारात विक्रीचा मारा चालूच आहे. त्यामुळे बुधवारी शेअर बाजार निर्देशांकांत मोठी घट झाली.
गेल्या चार दिवसापासून शेअर बाजाराचे निर्देशांक कमी होत आहेत. बाजार बंद होताना मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स 562 अंकांनी म्हणजे 1.12 टक्क्यांनी कमी होऊन 49,801 अंकांवर बंद झाला. त्याचबरोबर विस्तारित पाया असलेल्या राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी 189 अंकांनी कमी होऊन 14,721 अंकांवर बंद झाला.
आजच्या विक्रीच्या वातावरणातही आयटीसी, इम्पासिस आणि एचडीएफसी या कंपन्यांच्या शेअरच्या भावात थोडीफार वाढ झाली. सरकारी बॅंका,धातू, वाहन क्षेत्रासह सर्व क्षेत्रांचे निर्देशांक आज कमी झाले. जागतिक शेअर बाजारातही विक्री चालू असल्यामुळे निर्देशांक कमी झाले.
कोणत्या कंपन्यांचे शेअर घसरले…
ओएनजीसी, सन फार्मा, स्टेट बॅंक, इंडसइंड बॅंक, बजाज ऑटो, पावर ग्रिड, रिलायन्स इंडस्ट्रीज, आयसीआयसीआय बॅंक
याबाबत बोलताना रिलायन्स सिक्युरिटीज या संस्थेचे विनोद मोदी यांनी सांगितले की, अमेरिकेच्या फेडरल रिझर्व्हची बैठक मंगळवारपासून चालू आहे. या बैठकीतील निर्णयाकडे गुंतवणूकदारांचे लक्ष आहे. घाऊक महागाई वाढल्याची आकडेवारी जाहीर झाली आहे. त्या अगोदर किरकोळ महागाई वाढल्याची आकडेवारी जाहीर झाली होती. एकीकडे महागाई वाढत असताना औद्योगिक उत्पादन कमी झाले आहे. त्यातच कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. या कारणामुळे नजीकच्या भविष्यात भारतीय अर्थव्यवस्थेवर परिणाम होईल असे गुंतवणूकदारांना वाटते. याशिवाय भारताच्या दृष्टीकोनातून आणखी एक डोकेदुखी म्हणजे क्रुडचे दर वाढत आहेत. त्यामुळे भारताला क्रुड आयातीसाठी बरीच रक्कम मोजावी लागणार आहे.