पुसेगाव – विसापूर (ता. खटाव) येथील शेतकरी व माजी सैनिक जगन्नाथ रंगराव साळुंखे यांनी शनिवारी (दि. 13) वासराचे बारसे करत अनोखी परंपरा जोपासली. साळुंखे यांच्या खिल्लार गायीला काही दिवसांपूर्वी खोंड झाले. तिच्या वासराला मुलगा मानून साळुंखे यांनी या वासराचे बारसे वाघेश्वरी व नवलाईदेवी मंदिराच्या आवारात मंडप घालून, पाळणा सजवून, पाळणे गाऊन केले.
जगन्नाथ साळुंखे यांनी खिल्लार जातीच्या पशुधनाचे संगोपन केले आहे. त्यांच्या सोनी नामक गायीने काही दिवसांपूर्वी वासराला जन्म दिला होता. त्याच वेळी साळुंखे यांनी वासराचे नामकरण करण्याचे ठरविले. त्यासाठी त्यांनी गाय-वासराला आंघोळ घालून सजवले. तिची विधिवत पूजा करून नामकरण सोहळ्यासाठी तयार केले. सजवलेल्या पाळण्याजवळ वासरू ठेवून त्याचे “सोन्या’ असे नामकरण केले.
त्यानंतर परंपरेनुसार महिलांना पेढे व घुगऱ्या देऊन पाळणे म्हणण्यात आले. अन्नदान करण्यात आले. विसापुरात या वासराच्या बारशाची लगबग पाहायला मिळाली. आपल्या मुलांप्रमाणे जनावरांनादेखील जीव लावणारे शेतकरी कुटुंब पाहायला मिळाल्याची भावना पंचक्रोशीतील नागरिकांनी व्यक्त केली. पूर्वी बैलगाडी शर्यत व शेतीसाठी खिल्लार बैलांना मागणी असायची.
आता शेतीचे यांत्रिकीकरण झाले असून बैलगाडा शर्यती बंद झाल्याने या बैलांचा वापर होत नाही. त्यामुळे खिल्लार जात नामशेष होईल, अशी भीती आहे. ग्रामीण भागातील शेतकऱ्यांनी खिल्लार गायींचे महत्त्व ओळखून गोपालन करावे, असे साळुंखे म्हणाले. हरिभाऊ सावंत, नवनाथ साळुंखे, बाळासाहेब सावंत, उमेश सावंत, भीमराव जगताप, मुरलीधर साळुंखे, गुलाबराव साळुंखे उपस्थित होते.