उत्तर टाळून सभागृहातून काढता पाय : माहिती देण्यासही टाळाटाळ
पुणे – राज्यातील राजकारण ढवळून काढणाऱ्या पूजा चव्हाण या 22 वर्षीय मुलीच्या मृत्यूप्रकरणानंतर संजय राठोड यांनी वन मंत्रीपदाचा राजीनामा दिला. या प्रकरणाच्या तपासासंदर्भात आयोजित एका पत्रकार परिषदेमध्ये पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांना पत्रकारांनी प्रश्न विचारला. मात्र, त्यावर उत्तर देण्याऐवजी गुप्ता खुर्चीवरुन उठून हॉलबाहेर गेले.
या पत्रकार परिषदेमध्ये पत्रकारांनी पूजा चव्हाणप्रकरणी संशयित असलेले संजय राठोड यांच्याविरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला आहे का?, पोस्टमार्टम अहवाल नेमका काय आले आहे, यासारखे प्रश्न विचारले.
मात्र, या प्रश्नांना उत्तर देण्याऐवजी गुप्ता हे हसतच आपल्या जागेवरुन उठले आणि हॉलबाहेर पडले. पूजा चव्हाण तपासासंदर्भातील कोणत्याही प्रश्नाचं उत्तर न देता पोलीस आयुक्त पत्रकार परिषद सोडून निघून गेले. पत्रकार त्यांना “काहीतरी माहिती द्या,’ अशी विनंती करत असताना त्याकडे साफ दुर्लक्ष करत गुप्ता यांनी हॉलमधून काढता पाय घेतला.
पोलिसांनी याप्रकरणी अद्याप एफआयआर दाखल केला नसून तपासाबाबत कोणीतीही माहिती पुणे पोलीस देत नसल्याचे पुन्हा स्पष्ट झाले आहे.