आजकाल सर्वच वस्तू स्मार्ट होत आहेत. असा एक नवा प्रयोग म्हणजे स्मार्ट हेल्मेट. खरेतर हेल्मेटचे मुख्य काम आहे गाडीला अपघात झाल्यास चालकाच्या डोक्याला मार लागू नये म्हणून असलेले सुरक्षाकवच. मात्र आता स्मार्ट हेल्मेटमुळे हेल्मेटचेही आता बरेच काम वाढणार आहे आणि चालकाला हेल्मेटचे विविध फायदे मिळणार आहे.
हे स्मार्ट हेल्मेट बनवले आहे वाराणसीमधील अशोका इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नोलॉजी आणि मॅनेजमेंटच्या एका विद्यार्थ्याने. हे हेल्मेट चालकाच्या जीवासोबत पेट्रोलचीसुद्धा बचत करेल. कारण या हेल्मेटमध्ये सेन्सर्स बसवलेले असून ट्रॅफिक सिग्नलजवळ हे सेन्सर आपोआप बाइक स्लो करतात. ट्रॅफिक सिग्नलच्या 50 मीटर अंतरावर आल्यावर हे सेन्सर ऍक्टिव्हेट होतात. यामुळे बाइकमधील पेट्रोलचीसुद्धा बचत होते. हे हेल्मेट रेडिओ फ्रिक्वेन्सी ट्रान्समीटरवर काम करतं.
या स्मार्ट हेल्मेटमध्ये दोन ट्रान्समीटर आणि एक रिसिव्हर आहे. रिसिव्हर हा बाइकमध्ये इन्स्टॉल केला जातो. वाहनचालकाने हेल्मेट घातल्यावर त्यातील ट्रान्समीटर ऍक्टीव्हेट होतो आणि बाइक चालू केल्यावर बाइकवरील रिसिव्हर चालू होऊन हेल्मेटला कन्टेक्ट होतो. दुसरा ट्रान्समीटर हा ट्रॅफिक सिग्नलवरील भागात लावला जातो. या ट्रान्समीटरच्या रेंजमध्ये कोणतीही गाडी आल्यास तो त्या गाडीला रेड सिग्नलचे ट्रॉन्समिशन देतो आणि गाडीवरील रिसिव्हर गाडी थांबवतो.
अपघात झाल्यास हेल्मेटमधील सेन्सर अपघात ठिकाणाचे लोकेशन पोलीस, ऍम्बुलन्स व कुटुंबियांना पाठवेल. या स्मार्ट हेल्मेटचे पेटेंट मिळणे अजून बाकी आहे. यात अजून बरेच बदल करायचे आहे. त्यानंतर हे हेल्मेट वापरता येऊ शकेल.