ऍम्स्टरडॅम – नेदरलॅन्डमध्ये शनिवारी बोईंग विमानाला इमर्जन्सी लॅन्डिंग करावे लागले. हवेतून जात असताना विमानातील इंजिनात एक स्फोट झाला. त्यानंतर विमानाच्या इंजिनाचा एक भाग खाली कोसळला. त्यामुळे बोईंग विमानाच्या सुरक्षिततेबाबत मोठे प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. आता नेदरलॅन्डमधील तज्ञांकडून या घटनेच्या कारणांचा शोध घेतला जात आहे.
विमानातून पडलेल्या इंजिनाचा भाग मीरस्सेन भागात पडला. त्यामुळे एक महिला जखमी झाली आहे. मास्टरीच विमानतळावरून उड्डाण केल्यानंतर थोड्याच वेळात ही घटना घडली होती. हे विमान न्यूयॉर्कला निघालेले होते. या विमानामध्ये जे इंजिन बसवलेले होते, त्या प्रकारचे इंजिन असलेल्या विमानांची उड्डाणे थांबवण्यात यावीत, अशी शिफारस बोईंग विमान कंपनीने केली आहे. अशा प्रकारची इंजिन असलेली बोईंग 777 बनावटीची विमाने सध्या 5 विमान कंपन्यांकडून वापरली जात आहेत.
या घटनेनंतर अमेरिकेतील यंत्रणांनी अतिरिक्त तपासणीची घोषणा केली आणि जपाननेही त्यांच्याकडील बोईंग 777 विमानांचा वापर स्थगित केला. त्याशिवाय पुढील कारवाईचा विचारही केला जात आहे. नेदरलॅन्डमधील घटनेदरम्यान विमानात 1-2 स्फोट झाले होते आणि नंतर इंजिनातून धूर यायला लागला होता, असे काही प्रत्यक्ष साक्षीदारांनी सांगितले. खाली पडलेल्या इंजिनाच्या भागाचे फोटो पाहता ते पंखांची पाती असावे असे वाटते. पण त्या भागाचे अनेक छोटे छोटे तुकडे झाले आहेत आणि ते तुकडे रहिवासी परिसरात विखुरले गेलेले आहेत. त्यामुळे प्रत्यक्ष तपासणी केल्यावरच त्याबाबतचा निष्कर्श काढता येऊ शकेल, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.