सेऊल : दक्षिण कोरियाच्या एका विमानातील प्रवाशाने विमान सुरू असतानाच दरवाजा उघडल्यामुळे आपत्कालिन परिस्थिती निर्माण झाली होती. हे विमान उतरत असताना या प्रवाशाने दरवाजा उघडला होता. गुदमरल्यासारखे वाटायला लागल्यामुळे आपण दरवाजा उघडला, असे या प्रवाशाने सांगितले. दक्षिणेकडील जेजू बेटावरून डेगू शहराकडे जाणाऱ्या एशियाना एअरलाइन्सच्या एअरबस मध्ये शुक्रवारी ही घटना घडली. या विमानामध्ये 194 प्रवासी होते आणि ही घटना घडली तेंव्हा विमान 700 फुटांवर होते.
प्रवाशाने अचानक दरवाजा उघडल्यामुळे वाऱ्याचा प्रचंड झोत विमानामध्ये शिरला. त्यामुळे विमानातील काही प्रवाशांना अस्वस्थ वाटायला लागले. काही जणांना किरकोळ दुखापत देखील झाली. सुदैवाने विमान सुखरुप धावपट्टीवर उतरले. त्यामुळे मोठी दुर्घटना टळली, असे एशियाना एअरलाईन्सच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.
डेगू पोलिसांना रविवारी पहाटे पर्यंत यासंदर्भातील कोणत्याही प्रश्नांना उत्तर दिले नव्हते. डेगू पोलिस अधिकाऱ्यांनी गोपनीयतेच्या मुद्द्यांचा हवाला देऊन त्या व्यक्तीबद्दल तपशील देण्यास नकार दिला.
विमानाचा दरवाजा उढणाऱ्या 33 वर्षीय प्रवाशाला तातडीने ताब्यात घेण्यात आले. हवाई सुरक्षा नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल त्याला 10 वर्षांपर्यंत शिक्षा होऊ शकते. गुदमरायला लागल्याने आपण दरवाजा उघडले, असे जरी त्याने प्राथमिक चौकशीत सांगितले असले तरी सविस्तर चौकशी केल्यावर “विमानातून बाहेर जाण्यासाठी’ दरवाजा उघडल्याचे त्याने सांगितले. नोकरी गेली असल्याने त्याच्यावर मानसिक ताण त्याच्यावर असल्यानेच त्याने हे कृत्य केल्याचे निष्पन्न झाले आहे.