ठोसेघर (वार्ताहर) – शिवकालीन ऐतिहासिक वारसा लाभलेला किल्ले वासोटा पाहण्यासाठी हजारो पर्यटक व गिर्यारोहक दरवर्षी येत असतात. अलीकडील काळात हा किल्ला सर करण्यात बाल मावळ्यांचा उत्साहदेखील दिसत आहे.
शिवजयंतीनिमित्त आखण्यात आलेल्या गिर्यारोहण मोहिमेत साताऱ्यातील हेरंब चव्हाण हा पाच वर्षांच्या चिमुकला सहभागी झाला होता. “छत्रपती शिवाजी महाराज की जय’ या घोषणेने स्फुरण चढून त्याने मोठ्या उत्साहात किल्ले वासोट्याची चढाई फत्ते केली. त्याचे गिरीप्रेमींमधून कौतुक होत आहे.
साहसी खेळांची आणि निसर्गाच्या सान्निध्यात दरीखोऱ्यांमध्ये भटकंती करण्याची आवड असणाऱ्या अनेक पर्यटक, दुर्गप्रेमींची पहिली पसंती किल्ले वासोटा आहे. कोयनेच्या घनदाट अभयारण्यातील या वनदुर्गाची कठीण आणि तितकीच रोमहर्षक सफर वन विभागाच्या तपासणी नाक्यापासून पुढे दोन तासात किल्ल्याच्या माथ्यावरील चढाईने पूर्ण होते.
त्यापूर्वी बामणोलीपासून साधारण एक-दीड तास बोटीने प्रवास करून मेट इंदवलीत जावे लागते. तेथे पोहोचल्यावर सध्या करोनाच्या नियमावलीचे काटेकोर पालन करण्याच्या सूचना दिल्या जातात. वन्यजीवांच्या सुरक्षिततेसाठी सर्व प्रकारच्या प्लॅस्टिकची नोंद झाल्यानंतर वन विभागाच्या परवानगीने दुर्गवारीस सुरुवात होते.
महाराष्ट्रासह देशभरातील कानाकोपऱ्यातून सुट्ट्यांच्या दिवशी, विशेषत: शनिवार-रविवारी हजारो पर्यटक ट्रेकिंगसाठी किल्ले वासोट्याकडे मार्गक्रमण करतात. दाट हिरवीगार झाडी, खडतर चढ-उतार म्हणजे गिरीप्रेमींसाठी खास पर्वणीच. त्यामुळे ट्रेकिंगसाठी बहुतांशी पर्यटक या ठिकाणी येतात. दीड-दोन तासांचा पायी प्रवास करत छत्रपती शिवरायांचा जयघोष करत मोठ्या उत्साहात हा किल्ला सर करतात. त्यामध्ये लहान मुलांचाही उत्साह मोठ्या प्रमाणावर दिसून येतो.
महाराष्ट्रातील बहुतांश ऐतिहासिक गडकोटांना आतापर्यंत भेटी दिल्या; परंतु वासोटा किल्ला सर करण्याचे आव्हान मोठे होते. या किल्ल्यावर चढाई करताना आमची दमछाक होत होती; परंतु अवघ्या पाच वर्षांचा हेरंब चव्हाण आणि सात-दहा वर्षे वयोगटातील ऋचा चव्हाण, कृपा साळुंके, मनस्वी चव्हाण या मावळ्यांचा उत्साह पाहून आम्हालाही प्रेरणा मिळाली. खाचखळगे, निसरडी पायवाट, दगड-गोट्यांमधून दोन तासांची खडी चढाई आणि दीड तासात तीव्र उतार पार करणारे हे बाल मावळे सगळ्यांचे लक्ष वेधून घेत होते.
– महेंद्र साळुंखे,
दुर्ग प्रेमी, मुंबई