पुणे – पैशाची हव्यास भल्याभल्यांची मती गुंग करते. असाच एक प्रकार पुण्यातील एका व्यवसायीकाबरोबर घडला आहे. ज्यादा नोटांच्या प्रलोभणापाई त्याला तब्बल 50 लाखाचा गंडा घालण्यात आला आहे. पाचशे रुपये दराच्या नोटा 50 टक्के जादा रक्कमेने मिळवून देण्याचे आमिष दाखविण्यात आले होते.
याप्रकरणी सिंहगड रोड येथील मनी लॉड्रिंगचा व्यवसाय करणारे आनंद जगन्नाथ गिल्डा (47, रा.सनऑर्बिट, सिंहगड रोड) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार, प्रकाश रेड्डी (रा. हुबळी कर्नाटक), सुभाष बाबा व राकेश (पुर्ण नाव माहीत नाही) या तिघांच्या विरुद्ध सिंहगड रोड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना मागील दिड वर्षापासून 10 फेब्रुवारीच्या कालावधीत सनसिटीरोड परिसरात घडली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार, आरोपींनी फिर्यादी गिल्डा यांना सांगितले की, भारतीय रिझर्व बॅंकेतून छापण्यात येणाऱ्या 500 रुपये दराच्या चलनी नोटांच्या एकाच सिरीजचे दोन बंडल छापखान्यातून बाहेर पडतात. एक बंडल भारतीय रिझर्व बॅंकेत जाते तर दुसरे बंडल ब्लॅक मार्केटमध्ये जाते. त्या 500 रुपये दराच्या बनावट नोटा, जादा दराने आपणास तात्काळ मिळवून देतो असे आश्वासन दिले.
यानंतर आरोपींनी गिल्डा यांना वारंवार फोन करुन त्यांचा विश्वास संपादन केला. यानंतर गिल्डा यांच्या घरी येऊन त्यांच्या पार्किगमध्ये गाडीत बसून आरोपींनी व्यवहार गेला. गिल्डा यांच्याकडून आरोपींनी 2 हजार रुपयाच्या दराचे 25 बंडल अशी 50 लाखाची रक्कम घेतली. ही रक्कम हिरव्या रंगाच्या बॅगेत ठेवण्याचा बहाणा करुन ते निघुन गेले. याप्रकरणाचा तपास एस.व्ही. उमरे करत आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार गिल्डा यांना आरोपींनी 50 लाखाच्या बदल्यात 75 लाखाच्या चिल्ड्रन बॅंकेतील नोटा(खेळण्याती) बॅंगेत भरुन दिल्या. त्या त्यांनी घरी जाऊन पाहिल्या असता, बनावट निघाल्या.