पुणे – महा एमएसएमई मॅरेथॉन एक्स्पोचे आयोजन बॅंक ऑफ महाराष्ट्र, पुणे पूर्व विभागाकडून, हडपसर येथे करण्यात आले होते. याला ग्राहकांकडून उत्फुर्त प्रतिसाद मिळाला. कार्यक्रमाचा उद्देश करोनाच्या काळात ढासळलेल्या अर्थव्यवस्थेमध्ये ग्राहकांशी संपर्क वाढवून त्यांना प्रेरित करणे हा होता.
यावेळी पुणे पूर्व विभागीय प्रमुख वीणा राव, विभागीय उपप्रमुख एन. पी. शानबाग, एजीएम-सीपीसी पुणे पूर्व विभाग पी. एस. सोमनाधम उपस्थित होते. यावेळी 34 ग्राहकांना बॅंकेचे कार्यकारी संचालक हेमंत टम्टा यांच्या हस्ते 35 कोटी रुपयांची कर्ज मंजुरी पत्रे वाटप करण्यात आली.
टम्टा यांनी बॅंक ऑफ महाराष्ट्रला मध्यम बॅंकांच्या वर्गवारीत पोहोचविण्यासाठी प्र्रयत्न चालू असल्याचे सांगितले.
पुणे पूर्व विभागीय प्रमुख वीणा राव म्हणाल्या की, एमएसएमईच्या बळकटीकरणासाठी केंद्र सरकार आणि बॅंक ऑफ महाराष्ट्र पुढाकार घेत असून एमएसएमई क्षेत्राला पुरेसा पतपुरवठा करण्यासाठी बॅंक ऑफ महाराष्ट्र प्राधान्य देते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तनुजा उरणकर यांनी केले.