मुंबई – शेअर बाजार निर्देशांक ( Stock market index ) विक्रमी पातळीवर असल्यामुळे बरेच गुंतवणूकदार सावध राहून कालपासून व्यवहार करीत आहेत. आज खरेदी-विक्रीच्या लाटा आल्यानंतर निर्देशांकात थोडीफार वाढ नोंदली गेली. बाजार बंद होताना मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स 91 अंकांनी म्हणजे 0.19 टक्क्यांनी वाढून 49,584 अंकांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी 30 अंकांनी वाढून 14,595 अंकांवर बंद झाला.
इन्फोसिस व विप्रो या कंपन्यांनी काल बराच नफा वाढल्याचे ताळेबंद जाहीर करूनही आज या कंपन्यांच्या शेअरची विक्री झाली. गुंतवणूकदार आता निर्देशांक उच्च पातळीवर असल्यामुळे खरेदी करण्याच्या मनस्थितीत नसल्याचे दिसून येते. माहिती तंत्रज्ञान कंपन्यानी चांगले ताळेबंद जाहीर करूनही माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील कंपन्या व बॅंकांच्या शेअरची जास्त विक्री झाली. तर औषध, वाहन आणि ग्राहक वस्तू क्षेत्राच्या कंपन्यांच्या शेअरची खरेदी झाली.
रिलायन्स इंडस्ट्रीज आणि एल अँड टी या निर्देशांकाशी संबंधित 2 कंपन्यांच्या शेअरच्या भावात वाढ झाल्यामुळे निर्देशाकांनाआधार मिळाला. मात्र ऍक्सिस बॅंक, एशियन पेंटस, अल्ट्राटेक सिमेंट या कंपन्यांना विक्रीचा मारा सहन करावा लागला. सकाळी बरीच नफेखोरी होऊन निर्देशांक कालच्या तुलनेत कमी झाले होते. मात्र नंतर काही गुंतवणूकदारांनी निवडक खरेदी केल्यामुळे निर्देशांकात थोडीफार वाढ होऊ शकली.
दुपारी घाऊक किमतीवर आधारित महागाईची सकारात्मक आकडेवारी जाहीर झाल्यानंतर गुंतवणूकदारांनी काही प्रमाणात खरेदी केल्याचे आनंद राठी शेअर्स अँड स्टॉक ब्रोकर्सचे विश्लेषक नरेंद्र सोळंकी यांनी सांगितले. डिसेंबर महिन्यात वाहन विक्रीतही 13.5 टक्क्यानी वाढ झाल्यामुळे निर्देशांकांना आधार मिळाला.
अमेरिकेतील राजकीय पेच निवळल्यानंतर अमेरिकेसह जागतिक बाजारातून सकारात्मक संदेश आले. भारतीय अर्थव्यवस्थेचा पाया मूळात मजबूत आहे. त्यामुळे थोडेफार करेक्शन झाले तरी दीर्घ पल्ल्यात निर्देशांक आगेकूच करतील, असे रिलायन्स सिक्युरिटी विश्लेषक विनोद मोदी यांनी सांगितले.