सिडनी –ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तिसऱ्या कसोटीच्या तिसऱ्या दिवशी भारतीय संघातील खेळाडू जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद सिराज यांच्यावर वर्णद्वेषी टिप्पणी करण्यात आल्याची तक्रार बीसीसीआयने शनिवारी आयसीसीचे मॅच रेफरी डेव्हिड बून यांच्याकडे केली आहे. यामुळे भारताच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यात एक नवीन वाद उद्भवण्याची शक्यता आहे.
बीसीसीआयच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सिडनी क्रिकेट मैदानावर एका मद्यधुंद प्रेक्षकांनी सिराजला मंकी (वानर) म्हणून संबोधले. तसेच भारतीय खेळाडू जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद सिराज यांना मद्यधुंद प्रेक्षकांनी शिवीगाळ केली. याबाबत बीसीसीआयने आयसीसीचे मॅच रेफरी डेव्हिड बून यांच्याकडे औपचारिक तक्रार केली.
तिसऱ्या कसोटी सामन्याच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या दिवशी खेळाडूंसोबत असा प्रकार घडला आहे.
तिसऱ्या दिवसाचा खेळ संपल्यानंतर कर्णधार अजिंक्य रहाणे आणि फिरकीपटू रविचंद्रन अश्विन यांच्या नेतृत्वात काही वरिष्ठ खेळाडूंनी दोन्ही पंच पॉल रायफल आणि पॉल विल्सन यांना माहिती दिली.
यानंतर पंच, सुरक्षा अधिकारी आणि भारतीय खेळाडू यांच्यात चर्चा करण्यात आली. यावेळी भारतीय संघ ड्रेसिंग रूमच्या जवळच उपस्थित राहिला. भारतीय सुरक्षा अधिकाऱ्यांनीही सुमारे पाच मिनिटे मैदानावर उपस्थित असलेल्या सुरक्षा कर्मचाऱ्यांशी चर्चा केली. यावेळी आयसीसीचे सुरक्षा अधिकारीही उपस्थित होते.
दरम्यान, 2007मध्ये सिडनी कसोटी दरम्यान मंकेगेट प्रकरण घडले होते. जेव्हा अँड्यू सायमंड्सने दावा केला की हरभजन सिंगने त्याला अनेक वेळा वानर म्हटले. परंतु या प्रकरणाच्या चौकशीनंतर हरभजन सिंगला निर्दोष ठरविण्यात
आले होते.