नवी दिल्ली – करोना व्हायरसचा प्रादुर्भाव झाल्यानंतर टर्म इन्शुरन्सचे महत्व लोकांना पटले. या काळात गुगलवर या योजनेची माहिती घेण्याचा अनेकांनी प्रयत्न केला. ही बाब ध्यानात घेऊन विमा कंपन्यांनी या काळात करोना कवच, करोना रक्षक, आरोग्य संजीवनी अशा योजना सुरू केल्या. योजना सोप्या, सुटसुटीत आणि सर्वसामान्य लोकांना समजेल अशा भाषेत असाव्यात यासाठी विमा नियंत्रकांनी प्रयत्न केले. आता याच आधारावर विमा नियंत्रकांनी स्टॅंडर्डडाईज्ड टर्म ईन्शुरन्स पॉलिसी, सरल जीवन विमा योजना 1 जानेवारीपासून सादर करण्यास विमा कंपन्यांना सांगितले आहे.
‘सरल बिमा योजना’ सर्वसामान्य लोकांना उपलब्ध होणार आहे. 18 ते 65 वयोगटासाठी ही योजना तयार करण्यात आली आहे. योजनेत किमान 5 लाख आणि कमाल 25 लाखाच्या रकमेची हमी मिळते. कोणत्याही विमा कंपनीने सरल विमा योजना दिली तरी त्यातील व्याख्या किंवा शब्द रचनेत फारसा फरक नसेल. त्यामुळे पहिल्यांदा विमा घेणाऱ्यांना या योजनेचा लाभ होणार आहे.
कंपन्यांच्या सध्याच्या विमा योजना गुंतागुंतीच्या असतात. त्यामध्ये अनेक अटी शर्ती व शर्थी असतात. परिणामी सर्वसामान्य गुंतवणूकदार अशा आयोजनाच्या आहारी जात नाहीत. ही बाब ओळखून विमा नियंत्रकांनी सरल विमा योजना सुरू करण्यास सांगितले आहे. यामुळे भारतातील विम्याचे संरक्षण मिळणाऱ्या नागरिकांची संख्या आगामी काळात वाढण्याची शक्यता आहे.
या योजनेचे आणखी एक वैशिष्टय म्हणजे ही योजना डिजिटली उपलब्ध होणार आहे. डिजिटल व्यवहार करणाऱ्या नागरिकांना काही प्रमाणात सवलत मिळणार आहे. इतर विमा पॉलिसी खरेदी करताना तुमचे मासिक किंवा वार्षिक उत्पन्न गृहीत धरले जात असे. यामध्ये विमा पॉलिसी घेणाऱ्याला उत्पन्नाची चिंता न करता स्वतःला परवडेल असा प्लॅन घेता येणार आहे. त्यामुळे अनियमित उत्पन्न असलेल्या लोकांना ही पॉलिसी वरदान ठरणार आहे. त्याचबरोबर ग्रामीण भागातील लोकांना आणि कमी उत्पन्न गटातील लोकांनाही अशा पॉलिसी विकत घेणार घेता येणार आहेत.