– शंकर दुपारगुडे
कोपरगाव (प्रतिनिधी) – कोपरगाव म्हणजे धरणाच्या पाण्यावर विसंबून असलेला आवर्षणग्रस्त तालुका. एकेकाळी जिथे पिण्यासाठी पाणी राशनवर घेण्याची वेळ आली होती. तर उन्हाळ्यात तब्बल २१ दिवसाड पाणी मिळते. ब्रिटिशकालीन गोदावरीच्या दोन्ही कालव्यांची स्थिती दयनिय झाली. बारमाही वाहणाऱ्या कालव्यावर या तालुक्यातील शेतकऱ्यांनी फळबागासह बारमाही पिके घेवून तालुका बागायत केला होता.
एकेकाळचा कॅलिफोर्निया म्हणून ओळखलेला तालुका पाण्याविना वाळवंट होत चालला. तालुक्याचे हक्काचे पाणी कमी झाले आणि शेतकरी हवालदिल झाला. कमी पाण्यावर येणाऱ्या पिकाच्या शोधात शेतकरी देश विदेशात भटकु लागला. नवनव्या पिकांचा शोध घेवू लागले. अखेर विश्वनाथ चौधरी यांनी
कमी श्रम, कमी पाणी, एकदाच गुंतवणूक, रासायनिक फवारणीचा खर्च शून्य, एकदा लागवड केल्यानंतर तब्बल २५ वर्षे फक्त नफा देणारे ड्रॅगन फ्रुट शेतात लागवड करून पहिल्याच वर्षी लाखो रूपयांचे उत्पन्न घेवून तालुक्यात नवा विक्रम करीत नव्या पिकातून नवी ओळख निर्माण केली.
‘ड्रॅगन फ्रुट’ हे फळ अतिशय औषधी असुन त्याला जगभरात सर्वाधिक मागणी आहे. बाजारपेठेत असलेली मोठी मागणी, वाजवी मिळणारा बाजार भाव यामुळे वर्षानुवर्षे द्राक्ष उत्पादन घेणारे तालुक्यातील कान्हेगाव येथील विश्वनाथ रामकृष्ण चौधरी यांनी विदेशी जातीचे ड्रॅगन फ्रुटची बाग आपल्या शेतात फुलवली.
द्राक्ष बागेला लागणारे भांडवल, मजुरावर करावा लागणारा खर्च, महागडी औषध फवारणी, मुबलक पाणी, मशागत इतके करूनही निसर्गाच्या कोप झाला तर सर्व मेहनत व भांडवल वाया जाते. गेल्या १२ वर्षांपासून द्राक्ष बागायत म्हणून नावलौकीत असलेल्या विश्वनाथ चौधरी यांना नवी संकल्पना सुचली.आणि चौधरी यांनी ड्रॅगन” फ्रुटची शेती करण्याचा निश्चय केला.
पारंपरिक पिकाला फाटा देत चौधरी यांनी ड्रॅगन फ्रुटची बाग फुलवल्याने परिसरातील व राज्यातील अनेक शेतकऱ्यांसमोर नवा आदर्श निर्माण केला आहे. चौधरी यांच्या ड्रॅगन फ्रुटची शेती पहाण्यासाठी व ती फळे विकत घेण्यासाठी मोठमोठ्या शहरातील व्यक्ती गर्दी करीत आहेत. नव्या तरुण शेतकऱ्यांना या वृध्द शेतकऱ्याने एक वेगळी दिशा दिली आहे.
शेतकऱ्यांनी पारंपारिक फळ पिकांना फाटा देत ड्रॅगन झाडांची लागवड करून वेगळी वाट चोखंदळावी व जास्तीत जास्त नफा करून घ्यावा असे आवाहन चौधरी यांनी शेतकऱ्यांना आपल्या कृतीतून दाखवले आहे. बाजारपेठेतील वाढती मागणी, कमी कष्टात अधिक उत्पन्न, इतर कोणताही आवातंर खर्च नाही खडकाळ जमिनीतही कमी पाण्यावर डौलदार वाढ, सलग सहा महिणे फळांची लागवड व तोडणी सुरु राहते. म्हणुन राज्यातील कष्टकरी शेतकऱ्यांसाठी ड्रॅगन फ्रुटची शेती एक वरदान आहे. तेव्हा अधिकाधिक शेतकऱ्यांनी या पिकाकडे वळून एकदाच गुंतवणूक करून २५ वर्षे कमाई करावे असे आवहान चौधरी यांनी शेतकऱ्यांना केले.
विश्वनाथ चौधरी यांनी आपला अनूभव सांगताना म्हणाले, १९८५ सालापासून द्राक्ष उत्पादन घेत होतो. मात्र गेल्या वर्षी सव्वा एकर ड्रॅगन झाडांची लागवड केली त्यासाठी सुरुवातीला सहा लाख रुपयांची गुंतवणूक केली. ६१२ पोल लावले. एका खांबावर प्रत्येकी चार झाडे कलकत्ता (पश्चिम बंगाल ) येथून आणली. चालू वर्षी तीन लाख रुपये उत्पन्न हातात आले. असून पुढील पंचवीस वर्ष फळे येत राहणार आहे. सदर फळाला कुठलाही रासायनिक खतांची फवारणी करावी लागत नाही .फक्त सेंद्रिय खताचा वापर केला. झाडाला काटे असल्याने जनावरे त्रास देवून त्यातून नुकसान होत नाही. झाडाला फुल आल्यानंतर ३० दिवसांत फळे लगडतात. जून ते नोव्हेंबर पर्यंत झाडाला फळे येतात. सदर झाडाला मोठी फुले येत असल्याने शेतकरी मधमाशी पालन सारखा दुय्यम व्यवसाय सुरु करू शकतात.
ड्रॅगन फ्रुट खाल्याने शरीरातील पांढर्या पेशीसह रक्त वाढणे तसेच रोग प्रतिकार शक्ती वाढणे इत्यादी फायदे मिळत असल्याने मुंबई-पुणे सारख्या मेट्रो शहरासह स्थानिक बाजारपेठेत या फळाला मोठी मागणी आहे. जागेवर दोनशे रुपये किलोने माल विकला आहे. मुंबई येथून फळ व्यापारी येऊन त्यांनी देखील माल खरेदी करून घेऊन गेले. यामुळे शेतकऱ्यांनी या फळ झाडांची लागवड करावी असे आवाहन विश्वनाथ चौधरी यांनी केले आहे. या सर्व झाडांची लागवड व निगा त्यांचा नातू कुणाल चौधरी हाच पाहतो असे ही चौधरी यांनी आवर्जून सांगितले.