मुंबई – महाराष्ट्र विधानपरिषदेवर धुळे तथा नंदुरबार स्थानिक प्राधिकारी संस्थांद्वारे नवनिर्वाचित सदस्य अमरिश रसिकलाल पटेल यांनी सदस्यत्वाची शपथ घेतली. विधानपरिषद सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांच्या उपस्थितीत विधान भवनातील त्यांच्या दालनात मंगळवारी पार पडलेल्या या शपथविधी समारंभास विधानपरिषद विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर आणि दोन्ही सभागृहातील इतर मान्यवर सदस्य उपस्थित होते.
महाराष्ट्र विधानसभा सदस्यांद्वारा नवनिर्वाचित सदस्य गोपिचंद कुंडलिक पडळकर यांचा विधानपरिषदेत संसदीय कार्यमंत्री ड.अनिल परब यांनी परिचय करुन दिला.
करोना आजाराने निधन झालेल्या सर्वांना आदरांजली
कोविड-19 च्या नैसर्गिक आपत्तीमध्ये राज्यात, देशात आणि संपूर्ण जगात कोविड योद्धा म्हणून कार्य बजावत असताना शहीद झालेल्या आणि या आजाराने निधन झालेल्या सर्वांना विधानपरिषदेत सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यांनी आदरांजली अर्पण केली.
मार्च 2020 पासून करोनाच्या जागतिक महामारीचे संकट आपल्यासमोर उभे आहे. या संकटातून बाहेर पडण्यासाठी शासन स्तरावर सर्वतोपरीने प्रयत्न केले जात आहेत. करोनाचा प्रादुर्भाव कमी झाला असला तरी आपण सर्वांनी काळजी घेणे आवश्यक आहे, असेही सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यांनी यावेळी सांगितले.