प्रभास आणि एसएस राजामौली यांचा “छत्रपती’ या सुपरहिट साउथ चित्रपटाचा हिंदी रिमेक येत आहे. या चित्रपटात तेलगू चित्रपटसृष्टीतील अत्यंत प्रतिभावान आणि आघाडीचा अभिनेता बेलमकोंडा साई श्रीनिवास बॉलीवूडमध्ये पदार्पण करण्यासाठी सज्ज झाला आहे. पेन स्टुडिओ दिग्दर्शित हा बॉलीवूड प्रोजेक्ट डॉ. जयंतीलाल गडा हे निर्मिती करणार असून बेलमकोंडा याला चित्रपटासाठी यापूर्वीच साइन केले आहे.
बेलमकोंडा श्रीनिवास याने अल्पावधीतच टॉलीवूडमध्ये आपले नाव केले असून यू ट्यूबवर त्याच्या चित्रपटांनी धम्माल केली आहे. हिंदी चित्रपटसृष्टीत पदार्पण करण्यास उत्सुक असलेला बेलमकोंडा म्हणाला, हिंदी चित्रपटांमध्ये प्रारंभ करण्यासाठी हा चित्रपट योग्य आहे. यातून मला जयंतीलाल गडाबरोबर काम करण्याची संधी मिळाली आहे. तसेच पुन्हा एकदा मला माझे पहिले दिग्दर्शक विनायक यांच्यासोबत काम करण्याची संधी मिळाली.
प्रभासची ही व्यक्तिरेखा साकारण्याची माझ्यावर मोठी जबाबदारी आहे. पण, मला आनंद आहे की मला हे काम करण्याची संधी मिळाली. एसएस राजामौली दिग्दर्शित “छत्रपती’ हा तेलुगु चित्रपट एक तरुण शिवाजी आणि त्याच्या कुटुंबावर आधारित आहे. तेलुगु भाषिक या चित्रपटात प्रभाससह श्रीया सरन, भानुप्रिया, प्रदीप रावत, नरेंद्र झा यांनी मुख्य भूमिका साकारली होती.