पाटणा – बिहार विधानसभेच्या स्पीकर पदाची निवडणूक आज होणार आहे. अशातच राजद अध्यक्ष लालू प्रसाद यादव यांचा एक कथित ऑडिओ क्लिप व्हायरल झाला आहे. या ऑडिओ क्लिपवरून बिहारमध्ये राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. ज्येष्ठ भाजप नेते सुशील कुमार मोदी यांनी लालू यांच्यावर सरकार पाडण्यासाठी कट रचत असल्याचा आरोप केला आहे.
कथित ऑडिओमध्ये लालू प्रसाद यादव एनडीएतील पासवान नामक आमदाराशी बोलत आहेत. यामध्ये त्यांना स्पीकर पदाच्या निवडणुकीवेळी अनुपस्थित राहण्यास सांगितले जात आहे. सोबतच लालू त्या आमदाराला मंत्रिपदाची ऑफरही देत आहे. तसेच अनुपस्थितीसाठी करोनाचे कारण सांगण्यास लालूंनी सांगितले. सूत्रांनुसार, हे आमदार जेडीयूचे ललन पासवान असल्याचे सांगितले जात आहे.
सुशील कुमार मोदी यांनी लालू प्रसाद यादव यांच्यावर सरकार अस्थिर करण्याचा आरोप ट्विटरद्वारे केला आहे. ते म्हणाले कि, लालू प्रसाद यादव जेलमधूनच एनडीएमधील आमदारांना फोन करत असून मंत्रीपदाचे आश्वासन देत आहेत.
सुशील कुमार मोदी यांनी आपल्या ट्विटमध्ये एक नंबरही शेअर केला आहे. ते म्हणाले कि, हा नंबर मी डायल केला असता तो कॉल थेट लालू प्रसाद यादव यांनी उचलला होता. तुरूंगात बसून अशा घाणेरड्या चाली खेळू नका. तुम्हाला यात यश मिळणार नाही, असे त्यांनी म्हंटले आहे.
लालू यादव ने दिखाई अपनी असलियत
लालू प्रसाद यादव द्वारा NDA के विधायक को बिहार विधान सभा अध्यक्ष के लिए होने वाले चुनाव में महागठबंधन के पक्ष में मतदान करने हेतु प्रलोभन देते हुए। pic.twitter.com/LS9968q7pl
— Sushil Kumar Modi (@SushilModi) November 25, 2020
तर, राजदने सर्व आरोप फेटाळून लावले असून ही ऑडिओ क्लिप बनावट असल्याचे सांगितले आहे. तसेच ऑडिओसोबत कोणीतरी छेडछाड केली असल्याचेही म्हंटले आहे.
दरम्यान, बिहारमध्ये एनडीएच्या सरकार प्रस्थापित झाल्यानंतर स्पीकर पदासाठी आज निवडणूक होणार आहे. जवळपास ५१ वर्षांनंतर या पदासाठी निवडणूक होणार आहे. महाआघाडीतर्फे राजद आमदार अवध बिहारी यांना आणि एनडीएकडून भाजप आमदार विजय सिंह यांना उमेदवारी देण्यात आली आहे.