पुणे – राज्य शासनाच्या आदेशानुसार शहरातील 9 वी ते 12वीच्या पालिकेच्या तसेच खासगी शाळा सुरू करण्यास मान्यता देण्यात आली असली तरी प्रत्यक्षात पुढील दोन दिवसात शहरात वाढणाऱ्या नवीन करोनाबाधित रुग्णांचा अंदाज घेऊन शाळा सुरू ठेवायच्या की बंद करायच्या याबाबतचा निर्णय महापालिकेकडून सोमवारपर्यंत घेतला जाण्याची शक्यता आहे.
त्यामुळे मुंबई महापालिकेच्या धर्तीवर शाळा सुरू होण्याचा निर्णय आणखी काही दिवस पुढे जाण्याची शक्यता आहे. दरम्यान, शाळांबाबत आपणही प्रशासनाशी चर्चा करणार असून त्यानंतरच अंतिम निर्णय घेतला जाणार असल्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी सांगितले.
राज्य शासनाकडून सोमवारपासू (दि.23) 9 वी ते 12वीचे वर्ग सुरू करण्यास अनुमती देण्यात आली आहे. शासनाच्या आदेशानुसार, महापालिका आयुक्तांनीही गुरूवारी महापालिका हद्दीतील शाळा सुरू करण्याचा आदेश दिला असून महापालिकेच्या शाळांसाठी पालिकेने तर खासगी शाळांसाठी जिल्हा प्रशासनाने सुरक्षा नियमावली जाहीर केली आहे. त्यानुसार, शाळांच्या स्वच्छता तसेच निर्जंतूकरणाचे काम सुरू असून शिक्षकांच्या करोना चाचण्या सुरू आहेत.
मात्र, त्याच वेळी शहरात गेल्या तीन दिवसांत करोनाच्या नवीन बाधितांचा आकडा दररोज 100ने वाढत असून दोन आठवडे 200च्या आत असलेला रुग्णसंख्येचा आकडा पुन्हा 400च्यावर गेला आहे. तर पुढील काही दिवसात एक हजारांच्या घरात जाईल. त्यामुळे, आरोग्य विभागासह प्रशासनाची चिंता वाढलेली असताना, शाळा सुरू झाल्यास या साथीचा प्रसार आणखी वेगाने वाढण्याची भिती आहे.