पुणे – मागील चार दिवसांपासून शहरात दीडशे ते अडीचशेच्या आसपास सापडणारी बाधित संख्या बुधवारी 384 वर पोहोचली. बाधित संख्या वाढली असली तरी एकूण नमुने तपासणीच्या तुलनेत हे प्रमाण जैसे थे आहे. पुढील आठ दिवसांत बाधित संख्या कशापद्धतीने वाढते, याकडे प्रशासनाचे लक्ष आहे. दरम्यान, करोनामुळे 6 जणांचा मृत्यू झाला आहे.
नोव्हेंबरमध्ये बाधितांची संख्या कमी-अधिक प्रमाणात वाढत आहे. शनिवार आणि रविवारी नमुने तपासणी संख्या कमी असल्यामुळे दुसऱ्यदिवशी बाधित संख्याही कमी होते. त्यामुळे दोन दिवसांत बाधित संख्या सव्वाशे ते दीडशेच्या आसपास होती.
मात्र, बुधवारी ही संख्या पावणेचारशेपर्यंत पोहोचली. दिवसभरात 2 हजार 743 संशियतांची नमुने तपासणी केली. आतापर्यंत तब्बल 7 लाख 73 हजार 879 जणांच्या तपासणी अहवालातून 1 लाख 65 हजार 426 बाधित सापडले. तर त्यातील 1 लाख 56 हजार 639 जण बरे झाले आहेत.
सध्या 4 हजार 386 बाधितांवर उपचार सुरू आहे. त्यातील 392 जणांची प्रकृती चिंताजनक आहे. 260 जण व्हेंटीलेटर, तर 132 जण अतिदक्षता विभागात उपचार घेत आहे. दिवसभरात 168 बाधित करोनामुक्त झाले.