पुणे – पीएचडीची पात्रता परीक्षा जुलैमध्ये झाली. दुसऱ्या फेरीमध्ये मुलाखत होऊन विषय व गाईड ठरणे अपेक्षित होते. मात्र, एका वर्षापेक्षा जास्त कालावधी उलटूनदेखील अद्याप दुसरी यादी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने जाहीर केलेली नाही. ती लवकर जाहीर करावी, अशी मागणी विद्यार्थ्यांकडून होत आहे.
विद्यापीठामार्फत पीएचडीपूर्व परीक्षा “पेट’ झाली. दरवर्षी साधारणपणे जुलैमध्ये ती घेतली जाते. त्यानंतर त्याचा निकाल जाहीर करून प्रवेशासाठी पहिली यादी जाहीर होते. त्यानंतर चार महिन्यांमध्ये दुसरी यादी जाहीर करणे अपेक्षित असते. मात्र ती अद्याप जाहीर झालेली नाही, असे विद्यार्थ्यांचे म्हणणे आहे.
करोनामुळे सर्व प्रक्रिया ठप्प झाली. तीन-चार महिने यावर काहीच कामकाज झाले नाही. अनलॉकची प्रक्रिया सुरू झाल्यानंतर विद्यापीठाचे शैक्षणिक कामे पूर्ववत होत आहे. याच काळात विद्यापीठाने अडीच लाख विद्यार्थ्यांच्या परीक्षा पार पडल्या, नवीन वर्षाच्या प्रवेशाची प्रक्रियाही झाली. त्यामुळे पीएचडीच्या दुसऱ्या यादीसाठी विलंब झाल्याचे दिसून येत आहे.
दरम्यान, करोनामुळे दुसरी यादी जाहीर करण्यास विलंब झाला आहे पण आता स्थिती काहीशी निवळल्याने मुलाखतींचे वेळापत्रक येत्या एक ते दोन दिवसांमध्ये जाहीर करण्यात येणार असल्याचे विद्यापीठाकडून सांगण्यात आले.