नगर – ज्येष्ठ नेते व साहित्यिक यशवंतराव गडाख यांच्या स्नुषा, राज्याचे जलसंधारणमंत्री शंकरराव गडाख यांची भावजयी व माजी सिनेट सदस्य प्रशांत गडाख यांच्या पत्नी गौरी गडाख यांनी गळफास घेवून आत्महत्या केली.
शनिवारी (दि. 7) सायंकाळी पाचच्या सुमारास घडलेल्या या घटनेची माहिती रात्री उशिराने समजल्याने मोठी खळबळ उडाली. दरम्यान, गौरी गडाख यांच्या पार्थिवावर सोनई येथील अमरधाममध्ये आज अंत्यसंस्कार करण्यात आले.
नगर शहरातील यशवंत कॉलनी येथील विरंगुळा बंगल्यात गडाख कुटुंबीय वास्तव्यास आहे. शनिवारी सायंकाळी पाचच्या सुमारास गौरी गडाख यांनी घरातच गळफास घेतला. त्यांना जवळच्या एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, तेथील डॉक्टरांनी उपचारापूर्वीच गौरी यांना मृत घोषित केले. तसेच तातडीने तोफखाना पोलीस ठाण्यास ही माहिती कळविली. पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला.
दरम्यान, गौरीच्या नातेवाईकांनी विरोध केल्याने मृतदेहाचे शवविच्छेदन नगरऐवजी औरंगाबाद येथील घाटी रुग्णालयात आज करण्यात आले. घाटी रुग्णालयात चार डॉक्टरांच्या पथकाने मृतदेहाची उत्तरीय तपासणी केली. त्याचा प्राथमिक अहवाल पोलिसांना प्राप्त झाला आहे. याप्रकरणी तोफखाना पोलीस ठाण्यात आज आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.