राजगुरूनगर,(प्रतिनिधी) – खेड तालुक्यात पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या 18 शाखांतून 104 सोसायट्यांच्या माध्यमातून मार्च 2024 अखेर 90.53 टक्के पीक कर्जाची वसुली झाली. 104 पैकी 20 सहकारी सोसायट्यांची 100 टक्के पीककर्ज वसुली झाली आहे. बँकेच्या विभागीय कार्यालयाला तब्बल 31 कोटी 39 लाख रुपये नफा झाला आहे, अशी माहिती बँकेचे संचालक आमदार दिलीप मोहिते पाटील, बँकेचे विभागीय अधिकारी विलास भास्कर यांनी दिली.
ग्रामीण भागात पुणे जिल्हा सहकारी बँक एक अग्रणी बँक म्हणून काम करते. सहकारी सोसायट्यांच्या माध्यमातून शेतकर्यांना पीक कर्जपुरवठा करते. खेड तालुक्यात जिल्हा बँकेच्या 18 शाखा आहेत या 18 शाखांना 104 सहकारी सोसायट्या जोडल्या आहेत त्यांच्या माध्यमातून पीककर्ज पुरवठा केला जातो. तब्बल 32 हजार 792 शेतकरी सभासद संख्या आहे.
मागील आर्थिक वर्षात राजगुरूनगर विभागीय कार्यलयाच्या माध्यमातून बँकेच्या 18 शाखांमधून शेतकर्यांना 294 कोटी 96 लाख रुपयांचे पीक कर्ज वाटप करण्यात आले होते त्यापैकी 267 कोटी 01 लाख रुपये मार्च अखेर वसूल झाले. खेड विभागीय शाखासह 18 शाखांमध्ये 865 कोटी रुपयांच्या ठेवी आहेत
खेड तालुक्यात पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या माध्यमातून पीक कर्ज, शैक्षणिक कर्ज, घर कर्ज व वाहन कर्ज, बिगरसेहेती कर्ज वाटप करण्यात येते. शेतकऱयांना खरीप हंगामासाठी टोमॅटो, ज्वारी, बटाटा, भात आणि इतर पिकासाठी पीक कर्ज वाटप केले जाते. तालुक्यात सर्वाधिक बटाटा व टोमॅटो पिकाला पीक कर्ज वाटप केले आहे.