लखनौ – नवरात्रीच्या पहिल्याच दिवशी उत्तर प्रदेशची राजधानी लखनौमध्ये एक भीषण अपघात झाला आहे. एका ट्रकने ट्रॅक्टर ट्रॉलीला धडक दिल्यानंतर ट्रॅक्टर जवळच्या तलावात बुडाला. या अपघातात 10 जणांचा मृत्यू झाला आहे.
मृतांमध्ये 9 महिला आणि एक लहान मुलीचा समावेश आहे. घटनेची माहिती मिळताच राज्य आपदा प्रबंधनाचे जवान घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी लोकांना बाहेर काढले. सर्व भाविक सीतापूरच्या दुर्गा मंदिरात दर्शनासाठी जात होते.
अटरियाचे रहिवासी चुन्नीलाल मौर्य हे नवस फेडण्यासाठी आपल्या कुटुंबीयांसोबत दुर्गा मंदिरात जात होते. तेव्हा ट्रॅक्टर ट्रॉलीत 45 जण होते. सकाळी साडेदहाच्या सुमार ट्रॅक्टर ट्रॉली सीतापूरहून इंटौजा कुंहरावा मार्गावर पोहोचली.
तेव्हा मागून एका ट्रकने या ट्रॅक्टर ट्रॉलीला जोरात धडक दिली. त्यामुळे हा ट्रॅक्टर आणि ट्रॉली जवळच्या एका तलावत बुडाला. या तलावात बुडून 10 जणांचा मृत्यू झाला. जखमींना जवळच्या रुग्णाल्यात दाखल करण्यात आले असून या प्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत.