टोकिओ – जपानचे माजी पंतप्रधान शिंजो ऍबे यांच्यावर आज शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमेरिकेच्या उपराष्ट्रपती कमला हॅरिस यांच्यासह जगातील अनेक देशांचे प्रमुख आणि प्रतिनिधी यावेळी उपस्थित होते.
यावर्षी 8 जुलै रोजी एका प्रचारसभेत ऍबे यांची एका माथेफिरूने हत्या केली होती. त्यानंतर 15 जुलै रोजी त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले होते. त्यानंतर आज जपान सरकारकडून शासकीय इतमामात अंत्यसंस्कार केले गेले. विविध राष्ट्रांचे तब्बल 700 प्रतिनिधी यावेळी उपस्थित होते.
दरम्यान, गेल्या वेळी जपानला आलो होतो तेव्हा ऍबे यांच्याशी सविस्तर चर्चा झाली होती. मात्र, आता या दु:खदप्रसंगी आपली भेट होत असल्याचे मोदी यांनी जपानचे पंतप्रधान किशिदा यांच्याशी बोलताना सांगितले.
ऍबे यांच्या काळात भारत आणि जपानमधील गेल्या 70 वर्षांपासून असलेले मैत्रीचे संबंध अधिक दृढ झाले होते. दरम्यान, पंतप्रधान किशिदा यांच्याशी द्विस्तरीय संबंधांवरही चर्चा करणार असल्याचे भारताकडून काल सांगण्यात आले होते.