सविंदणे- शिरूर तालुक्यातील कवठे-येमाई येथील जवळपास 55 पोल्ट्री व्यावसायिकांकडे सुमारे 9 लाख रुपये कर थकबाकी आहे. संबंधितांनी ग्रामपंचायतीस देयबाकी असलेला कर तातडीने जमा करावा, असे आवाहन शिरूर पंचायत समितीच्या सहायक गटविकास अधिकारी अर्चना कोल्हे यांनी केले आहे.
कवठे येमाई ग्रामपंचायत कार्यालयात आयोजित बैठकीत थकबाकीदार पोल्ट्री व्यावसायिकांना मार्गदर्शन करताना त्या बोलत होत्या. बैठकीच्या अध्यक्षस्थानी सरपंच अरुण मुंजाळ होते. ग्रामविकास अधिकारी संतोष गायकवाड यांनी थकबाकीदार पोल्ट्री व्यावसायिकांना तातडीने ग्रामपंचायतीस देय बाकी असलेला कर भरून सहकार्य करण्याचे आवाहन केले.
अनेक पोल्ट्री व्यावसायिकांकडे थकबाकी असून याबाबत ग्रामपंचायत व प्रशासनाने दिलासा देण्याची व सध्या आकारण्यात येणारा कर कमी करण्याची मागणी माजी उपसरपंच बबनराव वागदरे, अरुण रोहिले, ठकाजी गावडे, रामदास माळवदे, बबन गावडे व इतर पोल्ट्री व्यावसायिक यांनी केली.
यावर ग्रामपंचायत व प्रशासनाच्या वतीने संबंधित थकबाकीदार यांनी थकीत कर 3 टप्प्यात पूर्ण भरावा. ग्रामपंचायतीच्या वतीने प्रशासनाकडे पोल्ट्रीवरील कर कमी करण्यासंदर्भातील व्यावसायिकांची मागणी मांडून ती कमी करण्यासंदर्भात पाठपुरावा करण्यात येईल, असे आश्वासन सरपंच अरुण मुंजाळ, ग्रामविकास अधिकारी गायकवाड यांनी दिले. यावेळी ग्रामस्थ व ग्रामपंचायतीच्या वतीने सहायक गटविकास अधिकारी अर्चना कोल्हे यांचा सत्कार करण्यात आला.
- कर कसा भरायचा?
मागील काही वर्षांपासून दुष्काळ, ओला दुष्काळ व इतरही काही अडचणींमुळे पोल्ट्री व्यावसायिक आर्थिक संकटात सापडले आहेत. उत्पन्न कमी व खर्च जास्त त्यातच म्हणजे ग्रामपंचायत कर आकारणी ही जास्त झाल्याने हा कर भरायचा कसा? हा प्रश्न त्यांचेपुढे निर्माण झाला.