कबीर बोबडे
नगर – स्त्री भ्रूणहत्या रोखण्याबरोबर मुलींचा जन्मदर वाढण्यासाठी शासनस्तरावर व्यापक प्रयत्न सुरू आहेत. गर्भलिंग निदान, अवैध गर्भपात करणाऱ्या डॉक्टरांविरुद्ध कडक पावले उचलण्यात येत आहे, असे असले तरी मागील तीन वर्षांत जिल्ह्यातील लिंग गुणोत्तराची आकडेवारी पाहिल्यास स्त्री-पुरुष लिंग गुणोत्तरात कमालीची घट झाल्याची गंभीर बाब उघड झाली आहे. एक हजार मुलांच्या मागे मुलींचा जन्मदर 912 इतका असल्यामुळे नगर जिल्हा डेंजर झोनमध्ये आला आहे.
जिल्ह्यात गेल्या तीन वर्षांत मुलींच्या जन्मदराचे प्रमाण काही प्रमाणात वाढत असून, जिल्ह्यातील माता – पित्यांना लेकीचा जन्म आवडू लागल्याचे समाधानकारक चित्र आहे. मुलांच्या तुलनेत सरासरीने मुलींच्या जन्माची संख्या हळूहळू वाढत असल्याचे दिसत आहे. जिल्ह्यात सन 2016- 17 मध्ये 1 हजार मुलांच्या मागे केवळ 895 मुली होत्या. सन 2017 – 18 मध्ये यात 7 ने वाढ होऊन तो आकडा 902 झाला. 2018 – 19 मध्ये 2017 – 18 च्या तुलनेत 9 ने वाढ होऊन आज मुलीच्या जन्मदाराचा आकडा 912 इतका झाला.
गेल्या तीन वर्षात केवळ 15 ने वाढ झाली आहे. त्यामुळे जिल्ह्याच्या दृष्टीने काहीसा दिलासा वाटत असला तरी तब्बल 88 मुलींची घट ही जिल्ह्याच्या चिंतेत भर पाडणारी आहे. मुलींचा जन्मदर कमी असल्यामुळे जिल्ह्यात मुलींचा गर्भपात होतो का? हा सवाल उपस्थित होतो. कायद्यानुसार गर्भलिंग निदान करणे गुन्हा असून, गर्भपातासाठी वापरण्यात येणारी औषध विक्रीचे नियमही कडक करण्यात आले आहेत.
दुसरीकडे मुलींचा जन्मदर वाढण्यासाठी राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत गर्भवती महिलांच्या आरोग्याची काळजी घेणे, त्यांच्या विविध तपासण्या मोफत करणे, पूरक व पोषक आहार देणे, प्रसूती खर्च म्हणून रोख अनुदान देणे यासारखे पूरक कार्यक्रम राबविले जात आहे. त्याचबरोबर बेटी बचाओ, बेटी पढाओ उपक्रमांतर्गत मोफत शिक्षण, कन्यादान योजना यासारखे कार्यक्रम हाती घेऊन शासनस्तरावर व्यापक जनजागृती सुरू आहे. एवढे सगळे करूनही जिल्ह्यात हजार मुलांमागे मुलींचा जन्मदर सरासरी 88 ने कमी आहे. जिल्ह्यात मुलांच्या तुलनेत मुलींचा सरासरी जन्मदर कमीच आहे.
पीसीपीएनडीटी कायदा आणि ‘बेटी बचाओ, बेटी पढाओ’ ही मोहीम कठोरपणे राबविली गेली, त्यामुळे मुलींचा जन्मदर वाढला. अजून कठोरपणे हे उपक्रम राबवले गेले तर स्त्री जन्मदर प्रमाणातील सुधारणा आणखी चांगली होऊ शकते.
डॉ एस. एन. सांगळे , जिल्हा आरोग्य अधिकारी