पुणे ग्रामपंचायतींकडून 81.98 टक्‍के घरपट्टी वसूल

पुणे – जिल्ह्यातील ग्रामपंचायतींकडून वसूल करण्यात येणारी घरपट्टी मार्च-2019 अखेरपर्यंत 81.98 टक्‍के झाली आहे. त्यामध्ये सर्वाधिक कर वसुली बारामती तालुक्‍यात झाली आहे. तर सर्वात कमी पुरंदर तालुक्‍यात झाली आहे. दरम्यान, अजूनही घरपट्टी वसुली सुरू असल्याचे जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहीणकर यांनी सांगितले.

जिल्ह्यातील 13 तालुक्‍यांतील ग्रामपंचायतींकडून घरपट्टी कर वसूल केला जातो. यावर्षी 284 कोटी 43 लाख 51 हजारांची घरपट्टी वसुलीची मागणी होती. त्यापैकी मार्च अखेरपर्यंत 233 कोटी 25 लाख 36 हजार रुपयांची वसुली झाली आहे. त्यामध्ये सर्वाधिक कराची मागणी हवेली तालुक्‍यातून असून, तब्बल 70 कोटी 63 लाख एवढी आहे. त्यातील आतापर्यंत 58 कोटी 85 लाख रुपयांची कर वसुली करण्यात ग्रामपंचायतींना यश आले आहे. त्यापाठोपाठ मुळशी येथे 49 कोटी तर शिरूर येथे 47 कोटी रुपयांची घरपट्टी वसुलीची मागणी आहे. या तालुक्‍यांमध्ये एमआयडीसीचा भाग असून, शहरापासून जवळ अंतर असल्यामुळे घरांची संख्या वाढली आहे. त्यामुळे या तीन तालुक्‍यांतून अधिक करातून ग्रामपंचायतींना उत्पन्न मिळते. आतापर्यंत मागणी करानुसार सर्वात जास्त करवसुली बारामती तालुक्‍यात असून, 6 कोटी 87 लाख 65 हजार रुपये वसुलीपैकी 6 कोटी 15 लाख 85 हजार रुपयांची वसुली झाली आहे. त्यामुळे या तालुक्‍यातील वसुलीचे प्रमाण साधारण 90 टक्‍के आहे. त्यापाठोपाठ भोर, दौंड आणि मुळशी तालुक्‍यांत वसुलीचे प्रमाण 85 टक्‍के आहे, अशी माहिती पंचायत विभागाकडून देण्यात आली आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.