पुणे – सिमेंटची दर वाढ अवाजवी

दर कमी करा : “क्रेडाई महाराष्ट्र’ची राज्य सरकारकडे मागणी

पुणे – भारतातील सर्व सिमेंट कंपन्यांनी सिमेंटची किंमत प्रति बॅगमागे 30 टक्‍क्‍यांनी वाढविल्याने सर्वसामन्यांसह बांधकाम व्यावसायिकांनाही कुठल्याही प्रकारचे बांधकाम करणे शक्‍य होणार नाही; तसेच यामुळे बांधकाम खर्चात देखील वाढ होणार असून, विकसकांना आणि पर्यायाने ग्राहकांना देखील याचा फटका बसणार आहे. त्यामुळे शासनाने यावर अंकुश ठेवणे गरजेचे आहे, अशी प्रतिक्रिया “क्रेडाई महाराष्ट्र’ चे अध्यक्ष राजीव पारीख यांनी दिली आहे.

सिमेंट च्या अवाजवी दरवाढीबाबत “क्रेडाई महाराष्ट्र’ने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन दिले आहे. तसेच लवकरच हे निवेदन प्रत्येक शहरातील संबंधित जिल्हाधिकाऱ्यांनाही देण्यात येणार आहे, अशी माहिती परीख यांनी दिली.

सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांना हे निवेदन याआधीच देण्यात आले आहे. या अवाजवी दरवाढीमुळे 2022 पर्यंत “सर्वांसाठी घरे’ हा केंद्र सरकारच्या महत्वाकांक्षी प्रकल्पाची उद्दिष्टपूर्ती होऊ शकणार नाही, अशी शक्‍यताही परीख यांनी व्यक्त केली आहे.

बांधकाम व्यवसाय सर्वाधिक रोजगार निर्मिती करणारा व्यवसाय आहे. तसेच यावर अवलंबून असणाऱ्या इतर पायाभूत सुविधा उपलब्ध करणाऱ्या व्यवसायांवर देखील या भाव वाढीचा विपरीत परिणाम होणार आहे. त्यामुळे या दर वाढीवर पुनर्विचार करून सरकारने सिमेंट कंपन्यांना दर वाढ कमी करण्याचे आदेश द्यावेत, अशी मागणी या निवेदनाद्वारे केली आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.