महिला टी-20 क्रिकेट चॅलेंज स्पर्धा : ट्रेलब्लेझर्सचा रोमांचक विजय

जयपूर – महिलांच्या टी-20 चॅलेंज स्पर्धेच्या पहिल्या सामन्यात ट्रेलब्लेझर्सने सुपरनोव्हाचा 2 धावांनी पराभव करत आगेकूच नोंदवली. यावेळी नाणेफेक गमावून प्रथम फलंदाजी करताना ट्रेलब्लेझर्सने निर्धारित 20 षटकांत 5 बाद 140 धावांची मजल मारत सुपरनोव्हासमोर विजयासाठी 141 धावांचे लक्ष्य ठेवले. प्रत्युत्तरात खेळताना सुपरनोव्हाच्या संघाला निर्धारित षटकांमध्ये 138 धावांचीच मजल मारता आल्याने त्यांना 2 धावांनी पराभव स्वीकारावा लागला.

यावेळी धावांचा पाठलाग करताना सुपरनोव्हाननेही दमदार सुरुवात केली. प्रिया पुनिया लवकर बाद झाल्यानंतर चामारी आटापट्टू आणि जेमिमा रॉड्रिग्जने पॉवर प्लेमध्ये 42 धावा केल्या. जेमिमा आणि आटापट्टूने दुसऱ्या विकेटसाठी 49 धावांची भागीदारी रचली. ही भागीदारी होण्यात ट्रेलब्लेझर्सच्या गचाळ क्षेत्ररक्षणाचाही चांगलाच हातभार लागला. अखेर सेलेमनने रॉड्रिग्जला थेट फेकीवर धावबाद करत महत्त्वपूर्ण बळी मिळवून दिला. त्यानंतर गोलंदाजीला आलेल्या राजेश्‍वरी गायकवाडने आटापट्टूला 26 धावांवर बाद करत सुपरनोव्हाजला तिसरा धक्‍का दिला.

तीन गडी बाद झाल्यानंतर मैदानावर असलेल्या कर्णधार हरमनप्रीत आणि नेताली सिव्हरने सुपरनोव्हाजचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला. मात्र, सिव्हरला राजेश्‍वरीने बाद करत चौथा धक्‍का दिला. त्यामुळे सुपरनोव्हाजच्या धावगतीला ब्रेक लागला. अखेरच्या 6 चेंडूत विजयासाठी 19 धावांची गरज असताना सुपरनोव्हाला 17 धावा करता आल्याने त्यांचा पराभव झाला.

तत्पूर्वी, प्रथम फलंदाजी करणाऱ्या ट्रेलब्लेझर्सला दुसऱ्याच षटकात पहिला धक्‍का दिला. सुझी बेट्‌स 1 धाव करून बाद झाली. त्यामुळे पॉवर प्लेमधील 5 षटकात 22 धावाच करता आल्या. पण, त्यानंतर कर्णधार स्मृती मंधानाने हरलीन देओलच्या साथीने धावगती वाढवण्यास सुरुवात केली. या दोघींनी सुपरनोव्हाजच्या फिरकी गोलंदाजांना टार्गेट केले. त्यांनी संघाला 10 षटकांत 52 धावांपर्यंत पोहोचवले.

स्मृतीने आपले अर्धशतक 47 चेंडूत पूर्ण केले. 15 षटकानंतर स्मृतीने आपला धावांचा वेग वाढवला. तिने आक्रमणाची सर्व सूत्रे आपल्या हाती घेत चौकार, षटकारांची बरसात करत संघाला 140 धावांची मजल मारून दिली.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.