- करोनामुळे तरुणही दगावताहेत
- 2492 नवीन बाधितांची नोंद
पिंपरी – पिंपरी चिंचवड शहरातील करोनाची परिस्थिती हाताळण्यात प्रशासनाला अपयश येत आहे. मोठ्या प्रमाणावर नागरिकांचे प्राण जात असून नवीन बाधितांमध्येही दिवसेंदिवस वाढ होत आहे. शहरातील मृतांच्या संख्येने उच्चांक गाठला आहे. शहरात शुक्रवारी तब्बल 71 रुग्णांचा मृत्यू झाला. शहरातील वाढत्या मृत्यूने शहरावासियांवर काळजीचे सावट पसरले आहे. तर मृत्यू रोखताना प्रशासनाची दमछाक झाली आहे. तसेच शुक्रवारी नोंद झालेल्या मृत्यूंमध्ये 18 वर्षीय तरुणी, 26 आणि 30 वर्षीय तरुणांचाही समावेश आहे.
पिंपरी चिंचवड शहरामध्ये आज 2492 बाधितांची नोंद झाली. शहरातील एकूण बाधितांची संख्या 1 लाख 95 हजार 929 झाली आहे. तर आतापर्यंत 3692 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. पालिकेने प्रसिद्ध केलेल्या पत्रकानुसार, शुक्रवारी (दि. 23) शहरात 2417 जणांना करोनाची लागण झाली. तर शहराबाहेरील 75 जणांचा तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. आजपर्यंत शहरातील 1 लाख 95 हजार 929 जणांना करोनाची लागण झाली आहे. आजची मृतांची संख्या काळजात धडकी भरवणारी असून 24 तासांत 71 बाधितांचा मृत्यू झाला असल्याची नोंद झाली आहे. त्यामध्ये शहरातील 43 तर शहराबाहेरील 28 जणांचा समावेश आहे. शुक्रवार नोंद झालेल्या मृत्यूूंमध्ये मालवणी येथील 18 वर्षीय तरुणी, संत तुकारामनगर येथील 26 आणि भोसरी येथील 30 वर्षीय तरुणाचाही समावेश आहे.
सर्वाधिक मृत्यू भोसरीमध्ये
शुक्रवारी प्रसिद्ध करण्यात आलेल्या पत्रकानुसार भोसरीमधील आठ नागरिकांचा मृत्यू झाला आहे. तर त्याखालोखाल चिंचवडमधील सहा नागरिक करोनामुळे दगावले आहेत. शहरातील सर्वच भागातील रुग्णांचे करोनामुळे मृत्यू होत आहेत. 26 ते 91 वयातील तब्बल 43 नागरिकांचा श्वास करोनाने थांबविला आहे.
आज दिवसभरामध्ये 1833 रुग्ण बरे झाल्याची नोंद करण्यात आली आहे. त्यामुळे बरे झालेल्या रुग्णांची संख्या 1 लाख 69 हजार 235 इतकी झाली आहे. तर दिवसभरात 8333 संशयित रुग्णांना महापालिकेच्या रुग्णालयामध्ये तपासणीसाठी दाखल केले आहे. त्यापैकी काही जणांचे स्वॅब तपासणीसाठी पाठविण्यात आले आहे. अद्याप 7619 रुग्णांचे अहवाल प्रतीक्षेत आहेत.
सद्यस्थितीत शहरातील महापालिकेच्या रुग्णालये व कोविड केअर सेंटरमध्ये 8384 रुग्ण उपचार घेत आहेत. तर गृह विलगीकरणात असलेल्या रुग्णांची संख्या 15,759 इतकी आहे. दोन्ही मिळून उपचाराधीन असलेल्या रुग्णांची संख्या 24,143 इतकी आहे. तसेच आज दिवसभरात 9256 जणांना लस देण्यात आली.
जिल्हा रुग्णालयात 29 करोनाबाधित
सांगवी येथील जिल्हा रुग्णालयात शुक्रवारी (दि. 23) 29 करोनाबाधित रुग्ण आढळले. रुग्णालयात उपचार सुरू असताना तीन महिलांचा मृत्यू झाला. रुग्णालयात सध्या 74 जणांवर उपचार सुरू आहे. त्यातील 51 जणांची प्रकृती चिंताजनक आहे. रुग्णालयातून आज 7 जण बरे होऊन घरी परतले. सोमवार पेठ-पुणे, दापोडी, वारजे माळवाडी, पिंपळे गुरव, पुनावळे, लोहगाव, सांगवी या परिसरातील हे रुग्ण आहेत. विश्रांतवाडी, बोपोडी, धनकवडी येथील तीन महिला रुग्णांचा करोनाने मृत्यू झाला. पिंपरी-चिंचवड आणि पुणे ग्रामीण येथील प्रत्येकी एका करोना संशयित रुग्णाला आज उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. रुग्णालयातून आत्तापर्यंत 1 हजार 467 रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. तर, एकूण 250 रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. 1 हजार 728 रुग्णांना होम क्वॉरंटाइन केले आहे.