नोंदणी पैकी 45 हजार स्मार्ट कार्डाचे केले वाटप
नगर – राज्य परिवहन महामंडळातर्फे वयाची 65 वर्ष पूर्ण करणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांनासाठी यापुढे वार्षिक मोफत प्रवास पास स्मार्ट कार्ड स्वरुपात देण्यात येणार आहे. यानुसार 4 हजार किमी प्रवास ज्येष्ठांना करता येणार आहे. एस टी महामंडळाच्या अहमदनगर विभागातील अकरा आगारात 65 हजार 800 ज्येष्ठ नागरिकांनी स्मार्ट कार्ड साठी नोंदणी केली.
राज्य परिवहन महामंडळाने प्रवाशांसाठी स्मार्ट कार्ड योजनेची अंमलबजावणी सुरू करण्यात आली आहे. या योजनेत प्रवाशांना कागदी पास ऐवजी स्मार्ट कार्ड दिले जाणार आहे. या स्मार्ट कार्ड साठी अगोदर नोंदणी करावी लागत असून नोंदणीनंतर दीडेक महिन्यानंतर स्मार्ट कार्ड मिळते. नोंदणी झालेल्या पैकी 45 हजार स्मार्ट कार्ड चे वाटप करण्यात आले. तर उर्वरित 20 हजार 800 स्मार्ट कार्ड नोंदणीधारक कार्ड पासून वंचित आहेत.
एस टी च्या विविध आगारात कार्यवाहीस सुरुवात करण्यात आली आहे. या केंद्रावर गर्दी वाढत असल्याने खाजगी केंद्रही सुरू करण्यात आली. महामंडळाकडून प्रवाशांना विविध सवलती दिल्या जातात. त्यात ज्येष्ठ नागरिकांना प्रवासात सवलत दिली जाते. या व्यतिरिक्त बसने नियमित प्रवास करणाऱ्या प्रवाशांना पास दिले जातात. यासाठी आता एस टी महामंडळाकडून मिळणाऱ्या विविध प्रवास दर सवलतीसाठी स्मार्ट कार्ड घेणे अनिवार्य करण्यात आले. परंतु, अद्यापही विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक, दिव्यांगा सारख्या बऱ्याच सवलत धारकांनी अद्याप हे स्मार्ट कार्ड तयार करून घेतले नाहीत. महामंडळाकडून येणाऱ्या वर्षात स्मार्ट कार्ड अनिवार्य करण्यात येणार आहे. त्यामुळे स्मार्ट कार्ड घेण्यासाठी 1 जानेवारी 2020 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली.