नगर जिल्ह्यात 12 मतदारसंघात 65 टक्के मतदान

नगर: विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी आज मतदान झाले असून पावसाच्या सावटाखालीही सकाळच्या सत्रात मतदारांची पावले मतदान केंद्राकडे वळाल्याचे चित्र पाहायला मिळाले. बाराही मतदारसंघात सायंकाळी ६ वाजेपर्यंत सरासरी अंदाजे 65 टक्क्यांहून अधिक मतदान झाल्याची माहिती निवडणूक यंत्रणेने दिली. अंतिम आकडेवारी मिळण्यास रात्री उशीर होण्याची शक्यता आहे.

सलग दोन दिवस जिल्ह्यात पाऊस सुरु असल्याने मतदानाच्या दिवशी मतदार बाहेर पडतील का, याची चिंता होती. मात्र, आज पावसाने सायंकाळपर्यंत विश्रांती घेतल्याने निवडणूक मतदान प्रक्रिया सुरळीत पार पडली. विविध मतदानकेंद्रांवर जिल्हा निवडणूक प्रशासनाने चांगली सुविधा केल्याने मतदान साहित्यास कोणताही फटका बसला नाही. त्यामुळे प्रत्येक केंद्रावरील मतदान प्रक्रिया सुरळीत पार पडली. सकाळच्या सत्रात मॉक पोल (अभिरुप मतदान) वेळी १६ बॅलेट युनिट, २४ कंट्रोल युनिट आणि ६४ व्हीव्हीपॅट यंत्रे बदलण्यात आली. प्रत्यक्ष मतदानावेळी बाराही मतदारसंघात १३ बॅलेट युनिट, १३ कंट्रोल युनिट आणि ११२ व्हीव्हीपॅट यंत्रे बदलण्यात आली. मात्र, निवडणूक प्रशासनाने तात्काळ कार्यवाही केल्याने मतदारांची गैरसोय टळली.

सकाळी 7 वाजता मतदानाला प्रारंभ झाला.पहिल्या दोन तासात म्हणजेच सकाळी 9 पर्यंत बारा मतदारसंघात केवळ 5.64 टक्के मतदान झाले. त्यानंतर सकाळी 11 पर्यंत हा आकडा 18.01 टक्क्यावर गेला. दुपारी 1 वाजता तो 33.73 तर तीन वाजता हा आकडा 40.20 टक्के म्हणजेच 50 टक्क्यापर्यंत गेला. त्यानंतर दुपारी 5 वाजता जिल्ह्यातील एकूण मतांची टक्केवारी 62.86 टक्के झाली होती. सहा वाजता मतदान संपले.

जिल्ह्यातील बाराही मतदारसंघातील मतदानाची अंदाजित सरासरी टक्केवारी पुढीलप्रमाणे- अकोले मतदारसंघ- सरासरी ६७.७३ टक्के, संगमनेर मतदारसंघ – ६९.३० टक्के, शिर्डी- ६४.२५, कोपरगाव – ६९.४०, श्रीरामपूर – ६२.१४, नेवासा – ७२.६४, शेवगाव – ६२.९९, राहुरी – ६३.१८, पारनेर – ६४.२०, अहमदनगर शहर-५२.६९, श्रीगोंदा- ६३.३८ आणि कर्जत-जामखेड – ७१.३४ टक्के.


मतदानासाठी नियुक्त महिला कर्मचार्‍यांचे हाल

जिल्ह्यातील बारा मतदारसंघात नियुक्त करण्यात आलेल्या कर्मचार्‍यांना निवडणूक प्रशासनाने कोणत्याही सुविधा उपलब्ध करून दिल्या नाही. त्यामुळे या कर्मचार्‍यांचे विशेषतः महिलांचे हाल झाले. रात्री आठनंतरही महिला कर्मचार्‍यांना कामातून मुक्त करण्यात आले नव्हते.त्यामुळे कर्मचार्‍यांमध्ये नाराजी व संतापाचे वातावरण आहे.
महिला कर्मचार्‍यांची सुरक्षा व येण्याजाण्याची व्यवस्था करण्याबाबत प्रसारमाध्यमांसह विविध कर्मचारी संघटनांनी निवडणूक प्रशासनाचे वारंवार लक्ष वेधले होते.आश्‍वासनाशिवाय प्रशासनाने काहीच केले नाही उलट कर्मचार्‍यांची गैरसोय केली.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)