पुणे – महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक वनीकरण विभागामार्फत वन महोत्सव साजरा करण्यात येत आहे. यासाठी सवलतींच्या दरात रोपे उपलब्ध करुन दिली जाणार आहेत. विशेष म्हणजे खासगी विनाअनुदानीत विद्यालये किंवा महाविद्यालयांनी रोपांची मागणी केल्यास नाममात्र एक रुपयाच्या दरात त्यांना रोप उपलब्ध करुन दिले जाणार आहे. यामुळे शाळा महाविद्यालयांनी त्यांच्या संरक्षण भिंतीभोवती रोपांची लागवड करावी असे आवाहन सामाजीक वनीकरण विभागामार्फत करण्यात आले आहे. सध्या सामाजीक वनीकरणाच्या पुणे विभागातील रोपवाटीकांमध्ये 66 लाख 54 हजार रोपे उपलब्ध आहेत.
सामाजिक वनीकरण विभागाने दिलेल्या माहितीनूसार, दिनांक 15 जून ते 30 सप्टेंबर हा काळ वन महोत्सवाचा काळ म्हणून दरवर्षी साजरा करण्यात येतो. या कालावधीत वृक्षलागवडीसाठी लोकांना उदयुक्त करण्याच्या दृष्टीने शासनामार्फत सवलतीच्या दराने रोपांचा पुरवठा करण्यात येत असतो. वृक्ष लागवड व संगोपन हा लोकांचा कार्यक्रम व्हावा, त्याचबरोबर जनतेला वनीकरणाचे महत्व पटवून देता यावे, या दृष्टीने वन महोत्सवाच्या कालावधीत सवलतीच्या दराप्रमाणे रोपांचा पुरवठा केला जातो. तसेच वृक्षारोपण व पर्यावरण संवर्धनाचे संस्कार विदयार्थ्यांवर होण्याकरिता, या कार्यात त्यांना अधिकाअधिक सहभाग घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
शाळा व महाविद्यालयांच्या परिसरांभोवती संरक्षक भिंती असल्याने रोपांचे संरक्षण व संवर्धन होणे सोयीचे असते. यामुळे वृक्ष लागवड करु इच्छिणाऱ्या खाजगी विना अनुदानित विद्यालये/महाविद्यालये यांनी रोपांची मागणी केल्यास त्यांचेसाठी नाममात्र प्रति रोप दर रु. 1 राहील. हा दर शंभर रोपांकरीता राहील. तर 101 ते 500 रोपे घेतल्यास हा दर 20 ते 40 (9 ते 18 महिऱ्यांची रोपे) रुपये राहिल. इतर वेळी प्रती रोप हा दर 23 ते 135 रुपयादरम्यान असतो. सामाजीक वनीकरणाच्या पुणे विभागाअंतर्गत पुणे, सोलापूर, सातारा, सांगली व कोल्हापूर हे जिल्हे येतात.
पुणे जिल्हयातील रोपांच्या माहितीसाठी वनक्षेत्रपालांचे संपर्क क्रमांक :
इरफान मुलाणी (पुणे) 9921673052, तनुजा शेलार(वडगाव मावळ) 9665294701, अनिल लांडगे (खेड) 8806313331, स्नेहा राऊत (जुन्नर)7719812922, जयश्री पवार (आंबेगाव) 9960575123, सरवन खान(भोर)9921786198, ज्ञानेश्वर साळुंके (सासवड), 9421051138, योगेश घोडके(बारामती)7387877616, विलास पवळे(इंदापूर)9075708965, नंदकिशोर पाटील (शिरुर)8668561439
पुणे, सोलापूर, सातारा, सांगली व कोल्हापूर सामाजिक वनीकरण विभागामध्ये एकूण 64 रोपवाटीका असून त्यामध्ये एकूण 66.54 लाख लहान व उंच रोपे उपलब्ध आहेत. ही रोपे जांभुळ, बेल, महारुख, आवळा, फणस, पेरु, कडीपत्ता, सावर, सिताफळ, वड, पिंपळ, साग, काजू, करंज, बहावा, बेहडा, शेवगा, करंज, लिंबू, रिटा, बकुळ, कडूलिंब, सिता अशोक, अर्जुन इत्यादि विविध प्रजातीची आहेत, असे सामाजिक वनीकरण विभागाचे वनसंरक्षक विजय भिसे म्हणाले.