मृत्यू रोखण्याचेच आव्हान
पुणे – शहरातील बाधित संख्या कमी आहे. तर, सप्टेंबर महिन्याच्या अखेरीपर्यंत तब्बल 17 हजाराहून अधिक सक्रीय बाधितांची असलेली संख्या आज 13 हजारापर्यंत खाली आली आहे. त्यामुळे आता मृत्यू आणि अत्यवस्थ बाधितांची संख्या कमी करणे हेच आरोग्य विभागासमोरील मोठे आव्हान आहे. दरम्यान, आज दिवसभरात नव्याने 630 बाधित सापडले आहेत. तर, गेल्या 24 तासात करोनामुळे 40 जणांचा मृत्युची नोंद झाली आहे.
सप्टेंबर महिन्याच्या अखेरीस शहरातील सक्रीय बाधितांची संख्या साडेसतरा हजार इतकी होती. तर, दररोजची बाधित संख्या दीड ते दोन हजार असायची.
मात्र, ऑक्टोबर महिन्याच्या सुरवातीपासून बाधित संख्या हळूहळू कमी झाली. त्याचबरोबर सक्रीय बाधित संख्येतही तीन ते चार हजारांनी घट झाली.
सध्या, शहरात 12 हजार 898 बाधित सक्रीय आहेत. त्यातील 858 बाधित अत्यवस्थ असून, 453 जणांना व्हेंटीलेटर लावण्यात आला आहे. तर 405 बाधित अतिदक्षता विभागात उपचार घेत आहेत.