बेपत्ता विमानाच्या शोधासाठी 5 लाखांचे बक्षिस

नवी दिल्ली – हवाई दलाच्या “एएन-32′ या बेपत्ता विमानाच्या शोधासाठी हवाई दलाने 5 लाख रुपयांचे बक्षिस जाहीर केले आहे. या विमानाच्या ठावठिकाण्याबाबत खात्रीशीर माहिती देणाऱ्याला 5 लाख रुपयांचे रोख बक्षिस देण्यात येणार आहे. हवाई दलाच्या पूर्व विभागाचे प्रमुख एअर मार्शल आर.डी. माथुर यांनी ही घोषणा केली आहे.

अरुणाचल प्रदेशमधील मेचुका भागातून 6 दिवसांपूर्वी हे विमान बेपत्ता झाले होते. तेंव्हापासून विविध पातळ्यांवर करण्यात आलेल्या प्रयत्नांनंतरही या विमानाचा कोणताही ठावठिकाणा समजू शकलेला नाही. म्हणून या विमानाच्या शोधासाठी बक्षिस जाहीर करण्याचा निर्णय हवाई दलाने घेतला असल्याचे हवाई दलाच्या प्रवक्‍त्याने सांगितले.

रशियन बनावटीचे “एएन-32′ हे मालवाहू विमान सोमवारी 13 प्रवाशांना घेऊन आसाममधील जोरहाट येथून अरुणाचल प्रदेशातील मेचुका येथे रवाना झाले होते. हा भाग चीनच्या सीमेजवळील आहे. याशिवाय हा भाग अतिशय डोंगरदऱ्यांचा आणि घनदाट जंगलाचा आहे. त्यामुळे टेहळणी विमानांबरोबरच प्रत्यक्ष जमिनीवरूनही विमानाचा शोध घेण्याचे काम सुरू आहे. नौदलाच्या विमानांनीही या विमानाचा शोध घेतला आहे.

शनिवारी खराब हवामानामुळे या विमानाच शोध घेतला जाऊ शकला नव्हता. हवाई दल प्रमुख बी.एस. धनोआ यांनी या शोधमोहिमेचा उच्चस्तरिय बैठकीमध्ये आढावा घेतला. या विमानात जे अधिकारी होते, त्यांच्या कुटुंबीयांशीही धनोआ यांनी संवाद साधला.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.